UPI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; आता प्री-अप्रुव्ह कर्जाच्या माध्यमातून करता येणार युपीआय व्यवहार
Loan Payments From UPI : UPI प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांनी जारी केलेल्या प्री-अप्रूव्हड कर्ज सुविधेचा समावेश केल्याने, ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.
नवी दिल्ली : देशभरात युपीआयद्वारे होणारे व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे युपीआयशी निगडित सुविधांमध्येही वाढ होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्री-सेंक्शन्ड किंवा प्री-अप्रूव्हड कर्जे किंवा क्रेडिट लाइन देखील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये समाविष्ट केल्या जात असल्याचे सांगितले.
ग्राहकांना मोठा फायदा होणार: आरबीआय
आतापर्यंत फक्त UPI प्रणालीद्वारे खात्यात असलेल्या रक्कमेचे व्यवहार केले जात होते. सध्या बचत खाती, ओव्हरड्राफ्ट खाती, प्रीपेड वॉलेट्स आणि क्रेडिट कार्डे UPI शी जोडली जाऊ शकतात. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की, UPI प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांनी जारी केलेल्या प्री-अप्रूव्हड कर्ज सुविधेचा समावेश केल्याने, ग्राहकांना मोठा फायदा मिळेल. त्याशिवाय, याचा फायदा भारतीय बाजारपेठेला होऊ शकतो, असेही आरबीआयने म्हटले.
एप्रिलमध्ये होता युपीआयचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, एप्रिल महिन्यातच यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचे (UPI) कार्यक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार, बँकांना बँकांमध्ये आधीच मंजूर असलेल्या कर्जातून हस्तांतरण किंवा हस्तांतरणास मान्यता देण्याची चर्चा होती. याचा अर्थ पूर्व-मंजूर कर्ज सुविधेतून हस्तांतरण देखील केले जाऊ शकते आणि निधी हस्तांतरण देखील केले जाऊ शकते.
युपीआयद्वारे कर्जाची रक्कम कशी मिळणार?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आधीच मंजूर केलेल्या कर्जाच्या माध्यमातून एखाद्या शेड्युल्ड कमर्शियल बँकेच्या ग्राहकाला क्रेडिट इश्यू करण्याची सुविधा मिळते. अर्थात यासाठी, ग्राहकाची याआधीच परवानगी घेतली जावी, अशी अट आहे. अशाप्रकारचा निधी, रक्कम युपीआयद्वारे हस्तांतरीत केल्या जाऊ शकतात.
युपीआयद्वारे व्यवहाराने गाठला 10 अब्जाचा टप्पा
ऑगस्टमध्ये, UPI व्यवहारांनी 10 अब्जांचा टप्पा ओलांडला. जुलैमध्ये UPI द्वारे झालेले व्यवहार 9.96 अब्ज इतके होते. UPI हे भारतातील डिजिटल पेमेंटचा कणा बनला असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
सिंगापूर, फ्रान्सनंतर आता न्यूझीलंडमध्येही युपीआय
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहे. सिंगापूर आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये UPI सुरू केल्यानंतर आता ते लवकरच न्यूझीलंडमध्येही पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात माहिती देताना वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, UPI चा वापर दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विचार केला जात आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि निर्यात विकास मंत्री डॅमियन ओ'कॉनर यांच्यात बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये UPI संदर्भात चर्चा झाली.
UPI च्या वापराबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि पेमेंट्स न्यूझीलंड यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. दोन्ही बाजूंनी याचे स्वागत केले असून यापुढेही विचार सुरू ठेवण्याचे मान्य करण्यात आहे. न्यूझीलंडमध्ये UPI सुरू झाल्यास दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल यावर सहमती झाली आहे.