(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Rules From 1st January 2023 : नव्या वर्षात 'हे' नियम बदलणार, खिशावर होणार परिणाम; बदल जाणून घ्या...
New Rules From 1st January 2023: नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. कोणते नियम बदलणार आहे वाचा सविस्तर...
New Rules From 1st January 2023 : नवीन वर्षात (New Year 2023) काही नियम बदलणार आहेत. 2023 या नवीन वर्षात बदलणाऱ्या नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँकिंग, विमा, पोस्ट ऑफिस इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्ही नव्या वर्षात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होईल. 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत. यासोबतच नॅशनल पेन्शन सिस्टिममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल होणार आहे.
नवीन वर्षात कोणते बदल होणार आहेत सविस्तर जाणून घ्या.
1. पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार
नवीन वर्षाची सुरुवातीलाच पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार आहे. सरकारने पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. NSC (NSC), मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत. ही वाढ 20 ते 110 बेसिस पॉइंट्सवरून करण्यात आली आहे. यासोबतच किसान विकास पत्राच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. नवे व्याज दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील.
2. वाहने महागणार
जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावरील बोजा आणखी वाढणार आहे. मारुती, किया, टाटा मोटर्स, मर्सिडीज, ह्युंदाई, ऑडी, रेनॉल्ट आणि एमजी मोटर्स यांसारख्या देशातील बहुतेक मोठ्या कार उत्पादकांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाहनांचे नवे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील.
3. क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल
2023 वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट मिळतात. नवीन वर्षाआधी हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Redeem) करुन घ्या. तसेच 1 जानेवारीपासून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. असे रिवॉर्ड पॉईंट्स डिसेंबर महिन्यामध्येच वापरुन घ्या.
4. बँक लॉकरचे नियम बदलणार
1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर लॉकरमध्ये ठेवलेला वस्तू हरवल्यास बँक त्याची जबाबदारी घेईल. यासोबतच लॉकरशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकेला ग्राहकांना माहिती द्यावी लागेल. ग्राहकांना बँकेच्या नव्या नियमावलीवर स्वाक्षरी करणे महत्त्वाचे आहे.
5. CNG आणि PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता
पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेचा इंधनाच्या नवीन किंमती जारी केल्या जातात. नव्या वर्षामध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता आहे. 2022 वर्षात नोव्हेंबर महिन्यामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला होता. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. नवीन वर्षात पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात कोणते बदल केले जातील हे पाहावं लागेल.
6. जीएसटी इलेक्ट्रॉनिक बिल आवश्यक
1 जानेवारी 2023 पासून GST नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त व्यवसायासाठी ई-इनव्हॉइसिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बिल अनिवार्य असणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 20 कोटी रुपये होती, ती आता 5 कोटी रुपये करण्यात आली आहे.
7. विमा प्रीमियम महागण्याची शक्यता
2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. IRDAI वाहनांचा वापर आणि देखभाल यावर आधारित विमा प्रीमियमसाठी नवीन वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.