Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate :सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक लागला आहे. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 4219 रुपयांची वाढ झाली.

Gold Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ झाली. तर, चांदीच्या दरात देखील 4219 रुपयांची तेजी दिसून आली. भांडवली बाजारात अस्थिरता वाढल्यास गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं.
24 कॅरेट सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. यामुळं सोन्याचे एका तोळ्याचे दर 137195 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचा दर 135443 रुपयांवर होता. चांदीच्या दरात देखील आज तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीचा दर 239994 रुपयांवर पोहोचला आहे. काल चांदीचा दर 235775 रुपयांवर होते. 24 तासात चांदीचे दर 4219 रुपयांनी वाढ झाली आहे.
आयबीजेएच्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 136646 रुपये तोळा, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 125671 रुपये आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 102896 रुपये तोळा आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 80259 रुपये एक तोळा असा आहे.
चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी सुरु झाली आहे. ज्यामुळं चांदीचे दर पुन्हा एकदा उच्चांकाजवळ पोहोचले आहेत. 7 जानेवारीला एक किलो चांदीचा दर 248000 रुपयांवर होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल चांदीचे 13000 रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
आयबीजेएच्या डेटानुसार सोन्याच्या दरानं 29 डिसेंबरला उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा एका तोळ्याचा दर 138161 रुपये होता. त्यानंतर सोन्याचे दर घसरले आहेत. विशेष बाब म्हणजे लग्न सराई येत्या काही दिवसात सुरु होईल. त्यामुळं सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होईल, परिणामी सोने आणि चांदीचे दर वाढलेले राहतील.
सोने आणि चांदीचे गुंतवणूकदार मालामाल
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. नववर्षात देखील सोने आणि चांदीच्या दरातील वाढीचा ट्रेंड कायम आहे. 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजारांवर होते. आता सोन्याचा दर 137195 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीचा दर देखील 31 डिसेंबर 2024 ला चांदीचा एक किलोचा दर 86 हजार रुपयांवर होता. तिथून सोने आणि चांदीच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरातील वाढीला विविध घटक कारणीभूत आहेत. जागतिक राजकारणातील तणाव वाढला की गुंतवणूकदार सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सध्या अमेरिकेनं आक्रमक धोरण स्वीकारलं आहे. व्हेनेझुएलावर हल्ला करत तिथल्या राष्ट्रपतींना त्यांनी अटक केली. या सर्व घडामोडींचा परिणाम सोने दरावर होत असतो. तर, चांदीचा औद्योगिक वापर वाढल्यानं मागणी वाढलीय.























