Adani Group : अदानी एंटरप्रायझेसकडून सेबीच्या नियमांचे उल्लंघन, स्टॉक एक्सचेंजकडून कारवाई
Adani Group Share : अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसवर बीएसई आणि एनएसईने कारवाई केली आहे.
मुंबई : अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेली अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) पुन्हा वादात सापडली आहे. देशातील शेअर बाजारातील दोन्ही स्टॉक एक्सचेंज बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) अदानी एंटरप्रायझेसवर कारवाई केली आहे. सेबीच्या (SEBI) लिस्टिंग नियमांचे पालन न केल्याबद्दल दोन्ही एक्सचेंजेसने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजेसने अदानी एंटरप्रायझेसकडून संचालक पदावर नियुक्तीच्या बाबतीत सेबीच्या (SEBI) नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्याने स्टॉक एक्सचेंजने 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोणतीही सूचीबद्ध कंपनी विशेष ठराव पारित केल्याशिवाय वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीची गैर-कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती किंवा त्यांना मुदत वाढ देऊ शकत नाही.
अदानी एंटरप्रायझेसने काय म्हटले?
अदानी एंटरप्रायझेसने बीएसई आणि एनएसईने लावलेला हा दंड चुकीचा असल्याचे म्हटले आहे. कंपनीने नियमांनुसार भागधारकांकडून मंजुरी घेतल्याचे म्हटले आहे. अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की नेक्टर लाइफ सायन्सेस ( Nector Life Sciences) विरुद्ध सेबी या प्रकरणात कायद्याचा अर्थ लावला गेला. आम्ही SEBI च्या लिस्टिंग नियमांचे पूर्णपणे पालन केले आहे आणि कंपनीकडून दंड माफ करण्याची विनंती बीएसई आणि एनएसईला करणार असल्याचे कंपनीने सांगितले. नियमांनुसार अशा नियुक्तीसाठी परवानगी घेण्याची गरज नसल्याचे ही अदानी एंटरप्रायझेसकडून सांगण्यात आले.
अदानी समूहाच्या स्टॉक्समध्ये तेजी
दरम्यान, मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2698 रुपयांवर बंद झाला आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर कंपनीचा शेअर 1017 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. पण त्या पातळीपासून शेअर सावरत असल्याचे चित्र आहे.
अदानी पॉवरचा समभाग आज 6.94 टक्क्यांच्या जबरदस्त उसळीसह बंद झाला. अदानी समूहातील स्टॉकमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवणारा हा शेअर ठरला. अदानी पॉवरच्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकदारांना दिवसभरातील व्यवहारात चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली. अदानी ट्रान्समिशन 3.96 टक्क्यांनी वधारत बंद झाला. एसीसीचा शेअर 2.21 टक्क्यांनी वधारला. अदानी टोटल गॅस 1.21 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला.
अदानी समूहातील 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली. अदानी विल्मरचा शेअर सर्वाधिक घसरला. हा शेअर 0.94 टक्क्यांच्या घसरणीसह स्थिरावला. अदानी ग्रीन 0.49 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 0.43 टक्क्यांनी घसरले. एनडीटीव्हीचे शेअर्स 0.33 टक्क्यांनी घसरले आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स 0.31 टक्क्यांनी घसरले.