उद्या संपूर्ण देश कोरोना सारख्या आजाराला नायनाट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकणार आहे. खऱ्या अर्थाने देशात उद्भवलेल्या आरोग्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नागरिकांच्या मनात लसीवरून मोठी उत्सुकता आहे. देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा लसीकरण यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई शहरात चार हजार जणांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे, यासाठी नऊ केंद्रावर 40 कक्ष सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय लसीकरणाची सुरुवात होत असली तरी हे मोठे काम असून यामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या काही चुका होतील त्यावर कोणत्याही पद्धतीचे 'राजकारण' न करता यशस्वीरित्या तोडगा काढून ही मोहीम पुढे कशी जाईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं अपेक्षित आहे.


सध्या तरी ही लस प्राधान्यक्रमाने आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना देणार असले तरी काही महिन्यानंतर सर्व सामान्यांना ही लस टोचण्यात येणार आहे. लस मोहिमेस सुरुवात होत असली तरी गेल्या काही दिवसात दररोज कोरोनाच्या आजाराचे सुमारे तीन हजार नवे रुग्ण राज्यात आढळत आहेत तर 50 पेक्षा जास्त मृत्यू रोज होत आहेत. त्यामुळे कोरोना अजूनही राज्यात धिंगाणा घालत आहे, हे यावेळी कुणी विसरता कामा नये.


लसीकरणाच्या मोहिमेची खरी परीक्षा तर उद्यापासून सुरु होणार आहे. देशात लसीला मान्यता मिळाल्यानंतर त्याची परिणामकारता, सुरक्षितता आणि उपयुक्तता यावर काही तज्ञांनी सवाल उपस्थित केले होते. त्यावर केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने यावर सविस्तर उत्तरे दिली होती. त्यानंतर काही काळासाठी का होईना या विषयावर पडदा पडला होता. भविष्यात आता लस कशी प्रतिसाद देते आहे यावरून या मोहिमेची यशस्वीता अवलंबून आहे. उद्या देशभरात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या औषध कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे वीस हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील सहा ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये चार वैद्यकीय महाविद्यालये आणि दोन जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे आता किती आरोग्य कर्मचारी ही लस घेण्यासाठी उद्या केंद्रावर दाखल होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सदर लसीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत, प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, एकदाच वापरात येणारी सिरिंज उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ही देण्यात आलं आहे.


मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "उद्यापासून लसीकरण मोहिमेला आरंभ होत आहे, याचा खरा तर आनंद आहे. आपण कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने उचललेलं हे एक पाऊल आहे. अजून लढाई बाकी आहे. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत जी आकडेवारी जाहीर करण्यात येते त्यामध्ये अजूनही नव्याने रोज राज्यात तीन ते साडे तीन हजार रुग्णांना या आजाराचा संसर्ग होत आहे. त्यात एक चांगली गोष्ट आहे की रुग्णांना बेड्स आणि आयसीयुची कमतरता भासत नसून योग्य वेळेत उपचार मिळत आहे. नागरिकांनी अजून काही काळ सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. सर्वसामान्यांना लस मिळायला आणखी काही काळ जाणार आहे. तो पर्यंत मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छ हात धुणे हे नियम पाळावेच लागणार आहे. या लसीकरण मोहिमेला उदयापासून सुरवात होत आहे, माझ्या मते बहुतेक लोक या मोहिमेत भाग घेतील आता उद्या पहिला दिवस कसा जातो हे पाहिल्यावर आपणास कळेल."


लसीकरणाच्या या मोहिमेदरम्यान काही 'उपद्रवी' अफवा पसरवू शकतात, या अशा अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच लसीकरण मोहिमेला बाधा आणणारे व्हॉटसअप संदेश आणि विडिओ वायरल होऊ शकतात. अशा मेसेजेसची सत्यता पडताळल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत. लसीकरण मोहीम हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. एका चुकीच्या संदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. कोरोना सारख्या संसर्गजन्य साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. यामध्ये कुणी समाजविघातक व्यक्ती काही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतील तर सर्वानी एकत्रितपणे हा त्याचा डाव उधळून लावला पाहिजे. नागरिकांना कोरोना विरोधातील या लसीकडून खूप अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकाचे गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शासनाने सुद्धा एखादा कोणताही लसीकरणाच्या अनुषंगाने काही चुकीची घटना घडली तर त्यावर तात्काळ माध्यमांमार्फत स्पष्टीकरण देऊन नागरिकांच्या मनातील प्रश्न दूर केले पाहिजे. या काळात नागरिकांसोबत सकारात्मक संवाद घडायला हवा, तर मोहिमेला चांगले यश प्राप्त होईल असे म्हणण्यास हरकत नाही.


13 जानेवारीला, 'लस आली 'अंगणी!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आलं होतं. त्यामध्ये, सध्या सगळीकडे लसीचे आगमन झाल्याचा अभूतपूर्व आनंद सोहळा देशातील आणि राज्यातील विविध शहरात पाहायला मिळत आहे. गेले अनेक महिने नागरिक कोरोना विरोधातील लसीची वाट पाहत होते. तो क्षण आज आला. बहुतांश भागात लसी पोहचल्या असून ठरल्याप्रमाणे 16 जानेवारीला राष्ट्रीय लसीकरण मोहिमेस सुरवात होईल. खरं तर लसीकरण मोहीम देशाला नवीन नाही यापूर्वी सुद्धा आपल्याकडे लसीकरण मोहीम घेण्यात आल्या आहेत आणि आजही सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराने ज्या पद्धतीने हाहाकार माजविला होता, त्यामुळे सर्वसामान्याच्या मनात या आजाराने जबरदस्त दहशत निर्माण केली होती. ज्याप्रकारे युद्धात आपल्या समोरील शत्रूचा वध होतो आणि त्यावर आपण विजय मिळवितो तशीच काहीशी भावना सध्या काही नागरिकांमध्ये दिसत आहे. मात्र या सगळ्या प्रकारात लस घेणे हा प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचाराचा भाग आहे याचे भान सगळ्यांनीच ठेवले पाहिजे. लसीकरणाच्या या वातावरणात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून त्याच्या वितरणाबाबत सजग राहिले पाहिजे. लसीकरणाच्या अनुषंगाने जोक्स आणि मिम्स बनवून उगाचच अतिउत्साह दाखवून परिस्थितीचे गांभीर्य कमी करता कामा नये. लस बनविण्याकरिता शास्त्रज्ञांनी फार मोठे कष्ट आणि परिश्रम घेतले आहे याची जाणीव ठेवून त्याचा आपण सगळ्यांनी आदर राखला पाहिजे.


लसीकरणास सुरुवात झाली म्हणजे कोरोना संपला हा गैरसमज करत काही प्रमाणात नागरिक सुरक्षितेच्या नियमांना धाब्यावर बसून दैनंदिन कामे करत आहेत. कोरोनाचा संसर्ग आजही अनेकांना होत आहे. लस हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, यामुळे कोरोना हा आजार होऊ नये यासाठी मदत होते. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यावर तो उपचाराचा भाग नाही हे नागरिकांनी ध्यानात ठेवावे. त्यासाठी जी उपचार पद्धती विकसित केली आहे ती घ्यावीच लागते त्याशिवाय अलगीकरण आणि विलगीकरण करावेच लागते. त्यामुळे नागरिकांनी येत्या काळात जो पर्यंत शासनाच्या आरोग्य विभागांकडून सूचना येईपर्यंत सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात होत असली तरी खऱ्या अर्थाने उद्यापासून 'गो कोरोना गो'ला आरंभ होत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग