कोरोनाविरोधातील लस येऊन लसीकरणाच्या मोहिमेस आरंभ झाला असून काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी ती लस घेतली सुद्धा. मात्र, मूळ मुद्दा कायम आहे. कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट कायम असल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. राज्याचा आरोग्य विभाग रोज कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन आकडेवारी प्रसारित करत असतो. त्यानुसार राज्यात बुधवारी 3 फेब्रुवारीला 2 हजार 992 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 30 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी बोलकी असून यामुळे आजही जवळपास 3 हजाराच्या घरात कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगायची गरज नसली तरी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून सर्वानी आपला वावर ठेवला पाहिजे हे यावरून अधोरेखित होत आहे.
त्याच दिवशी 7 हजार 30 रुग्ण बरे होऊन घरी जात असले तरी नवीन रुग्ण निर्माण होत आहे. या गोष्टी नजरेआड करून चालणार नाही, यामुळे भविष्यात मोठे धोके संभवू शकतात. डॉक्टरांनी विकसित केलेली उपचारपद्धती रुग्णांना लागू पडत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा अर्थ कुणी कोरोनाची साथ आता संपली असा घेत असेल तर सपशेल चूक आहे. संसर्गजन्य आजाराचा कधी उद्रेक होईल हे कुणालाच आजपर्यंत सांगता आलेले नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने काही नागरिक सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून किमान सार्वजनिक परिसरात मास्क न लावता हिंडत आहे, त्यांनी या कालच्या आकडेवारीवरून बोध घेऊन नियमांचे पालन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
कोरोना बाधितांची संख्या कमी होणे म्हणजे कोरोना हद्दपार झाला असा भ्रम तयार होणे चुकीचे आहे. यापूर्वीही कोरोनाची संख्या कमी झाली होती त्यानंतर त्याच ठिकाणी कोरोनाच्या संख्येचा उद्रेक निर्माण झाल्याचे सगळ्यांनीच पाहिले होते. कोरोनाचे वर्तन आजपर्यंत कुणीही सांगू शकलेले नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय हीच काळाची गरज आहे. आजही राज्यातील मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या ही तीन आकडी आहे. तर बहुतांश भागात दोन आकड्यांवर कोरोनाबाधितांची संख्या वर खाली होत आहे. या संसर्गजन्य आजाराला आपण वैद्यकीय दृष्टीतून बघणे अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला हजारो बाधित नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत व्हेंटिलेटरवर आहेत. आपल्या राज्यात आजही अनेकजण मास्क न लावता हिंडत असतात, राज्यात अशा मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. लोकांना शिस्त लावण्याचे काम सुरु आहे. जोपर्यंत कोरोनाविरोधातील लस सर्वांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत सध्याच्या घडीला या आजारापासून दूर राहण्यासही मास्क हे एकमेव शस्त्र सध्या उपलब्ध आहे. जगभरात नागरिक मास्क लावून फिरत आहेत. आपल्याकडे हळू-हळू आरोग्य साक्षरता निर्माण होत आहे. आरोग्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते ही समज नागरिकांमध्ये येत आहे.
मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केइएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, "हे अगदी बरोबर आहे, आपण कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, संकट कायम आहे. कारण राज्यात आजही मोठ्या संख्येने नवीन रुग्ण निर्माण होत आहे हे वास्तव आहे. त्यामुळे लोकांनी सध्याच्या काळात सावधगिरी बाळगत आपला वावर ठेवला पाहिजे. काही दिवसातच महाविद्यालये सुरु होत असून काही प्रमाणात लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता या काळात गर्दी होणार आहे. या अशा परिस्थितीत सुरक्षिततेचे जे नियम आखून दिले आहेत. त्याचा वापर कटाक्षाने केला पाहिजे. कारण लसीकरण जितक्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे त्यापद्धतीने अजूनही झालेले नाही. त्यामुळे अजून काही काळ तरी नियम पाळले पाहिजे. अजूनही आपल्याकडे 'हर्ड इम्युनिटी' लोकांमध्ये निर्माण झालेली नाही."
दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापी न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे. नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना घरी जाऊन वेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळप्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे का? हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येकजण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कोरोना कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, "शासनाने प्रतिबंधात्मक उपायाची जनजागृती करणे थांबविले आहे की काय अशी शंका उपस्थितीत होत आहे. कारण आकडे हे कमी जास्त होत आहे. या अशा काळात विषाणूमध्ये काही जनुकीय बदल झाले तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण केव्हाही सावध राहणे गरजेचे आहे. तसेच टेस्टिंगचे प्रमाण कमी झाले आहे असे वाटत आहे, त्यागोष्टीकडे आपण आजही गांभीर्याने पहिले पाहिजे. परदेशात अजूनही अनेक देशात सुरक्षिततेचे नियम कडक आहे, त्यामध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता आपले दैनंदिन कामकाज करावे. परंतु, सुरक्षिततेचे कोणतेही नियम पायदळी तुडवू नयेत."
सध्याच्या परिस्थित देश हा कोरोना नायनाटाच्या दिशेने प्रवास करीत आहे. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने रात्र दिवस राबवून ही परिस्थिती निर्माण केली आहे. विशेष म्हणजे याकरिता नागरिकांनी या सर्व प्रवासा दरम्यान जे काही सहकार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे. अजून थोडा काळ अशाच पद्धतीने जर सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला साथ दिली तर एक दिवस नक्कीच या महाभयंकर आजारावर आपण विजय मिळविल्या शिवाय राहणार नाही. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली असून लवकरच लस सर्वसामान्यसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर बहुतांश लोकांमध्ये या आजराविरोधात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होईल आणि आपोआपच या आजारापासून दूर राहण्यास मदत होईल.
BLOG | कोरोनावर नियंत्रण, संकट कायम
संतोष आंधळे
Updated at:
04 Feb 2021 06:14 PM (IST)
संसर्गजन्य आजाराचा कधी उद्रेक होईल हे कुणालाच आजपर्यंत सांगता आलेले नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने काही नागरिक सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून किमान सार्वजनिक परिसरात मास्क न लावता हिंडत आहे, त्यांनी या कालच्या आकडेवारीवरून बोध घेऊन नियमांचे पालन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -