BLOG : तरुणांना लस द्या!
आज 1 एप्रिल, लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु होत आहे. 45 वर्षांपुढील सर्वाना आता लसीकरणाची मुभा देण्यात आली असून अधिका अधिक नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्या वेगाने लसीकरण व्हावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. टप्प्या-टप्प्याने लसीकरण न करता आता 11 वर्षावरील सरसकट तरुणांना लस देण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण ज्यावेळी फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून 20 ते 45 वयोगटातील अधिक तरुणांना या आजाराचा संसर्ग पाहायला मिळत होता. कारण ही तरुण मंडळी नोकरी कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडत असतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ते वापर करीत असतात. त्यामुळे ते अनेकदा लक्षणविरहित असले तरी कळत नव्हते कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हते. हेच तरुण घरी येऊन परत घरातील वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्ग पसरवत होते. त्यामुळे आता लसीकरणासाठी असे कोणतेही टप्पे न ठेवता सर्व 18 वर्षांवरील तरुणांसाठी लस घेण्याची परवानगी आता केंद्र सरकारने राज्य शासनाला दिली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस सुरक्षित आहे हे आता दिसून आले आहे.
राज्यात देशातील एकूण रुग्णाच्या 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस राज्यातील जनतेला मिळणेअपेक्षित आहे. सध्या ज्या वयोगटात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आढळून येत आहे त्यामध्ये तरुण आणि चिमुकल्यांचा समावेश अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागने बुधवारी 31 मार्च रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत जेव्हापासून कोरोनाची साथ महाराष्ट्रात सुरु झाली, त्यामध्ये वयोगटानुसार बाधितांची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल की, सध्याच्या काळात कोरोनाने तरुणाईला लक्ष्य केले आहे. 0 ते 10 वर्ष - 87,105, 11 ते 20 वर्ष - 1,82,656, 21-30 वर्ष - 4,58,945, 31 ते 40 वर्ष - 5, 87, 150, 41 ते 50 वर्ष - 4,98,021, 51 ते 60 वर्ष - 4,44,930, 61 ते 70 वर्ष - 3,04.892, 71 ते 80 वर्ष - 1,47,489, 81 ते 90 वर्ष - 42,141, 91 ते 100 वर्ष 5, 342, 101 ते 110 वर्ष - 143 नागरिक बाधित झाले आहे. या सर्व वयोगट 31 ते 40 वर्ष वयोगटात बाधित होणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 21.28 % इतके आहे. शिवाय लहान मुलांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे, वर्षाभरापूर्वी हे प्रमाण कमी होते. यामुळे लसीकरण मोहिमेत तरुणांना सामावून घेतले पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
यापूर्वीच राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी राज्यात सरसकट लसीकरण चालू केले पाहिजे याबाबत मत व्यक्त केले होते. त्यांनी सांगितले होते की, "निश्चितच ज्या पद्धतीने कोरोना संसर्गाचा वेग राज्यात वाढला आहे. त्या पद्धतीने आता सगळ्यांचेच लसीकरण केले पाहिजे अशी सध्याची परिस्थिती आहे. या संदर्भात आम्ही शासनाला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यामुळे अधिकच्या लस कशा उपलब्ध होतील याकडे राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे. लसीचे उत्पादन कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत केंद्र सरकार काय धोरण घेत याबाबतीत मी काय फारसा सांगू शकणार नाही, मात्र लसीकरण आता सरसकट करण्याची गरज झाली आहे, किती तरी लसीकरणाची केंद्र ओस पडली आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊ शकते, एवढं मी शकतो. कोरोनाच्या अनुषंगाने सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. जितक्या जास्त प्रमाणात लसीकरण तितकेच या आजारांपासून संरक्षण नागरिकांना मिळू शकेल."
लसीकरणाला घेऊन काही लोकांच्या मनात आजही शंका कुशंका आहेत. तरी राज्यातील सर्वच बड्या राजकीय नेत्यांनी आतापर्यंत लस घेली आहे. काही समाज विघातक लोकं लसीकरणाच्या मोहिमेला घेऊन अफवा पसरवत आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेऊन नये. कारण केंद्र सरकारने आतापर्यंत दोन लसूण लसीकरणासाठी मानायला दिली आहे. त्या दोन्ही सुरक्षित आहे. सध्याच्या घडीला काही ठिकाणी लस उपलब्ध आहेत. तर लोकांचा प्रतिसाद कमी आहे. काही लोकांना लसीच्या परिणामकारतेवरून किंतु परंतु आहेत. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली आहे. केंद्र सरकाने या अगोदरच लस घेणे सुरक्षित असल्याचे सांगतिले आहे. दोन महिन्यापूर्वीच देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या महामारीचा अंत करण्यासाठी सगळ्यांनी लस घ्यावी म्हणून लसीकरणाबाबत संकोच नको या आशयाचे पोस्टरचे अनावरण केले, तसेच त्यांनी लस सुरक्षित आणि परिणामकारकता करणारी आहे, असेही आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हटले होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "तरुणाची संख्या ही फेब्रुवारी महिन्यांपासून अधिक झाली आहे. लस आहे पण तरुण लस घेऊ शकत नाही कारण वयाची अट अडसर ठरत आहे. हा अडसर केंद्र सरकारने तात्काळ दूर केला पाहिजे. कोरोनाविरोधातील शस्त्र लस उपलब्ध असून घेता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे केंद्र सरकरने महाराष्ट्राकरिता सर्व 18 वर्षावरील तरुणांसाठी लस घेण्याची परवानगी दिली पाहिजे. याकरिता त्यांनी लहान नर्सिंग होम लसीकरणाची केंद्र म्हणून जाहीर करायला हवी. कारण रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे, त्याला आळा घालण्याकरिता लसीकरण हा एकमेव योग्य उपाय आहे. खरं तर लहान मुलांना सुद्धा लस दिली पाहिजे मात्र त्यावर अजून केंद्र सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत."
राज्यात दररोज 3 लाख नागरिकांना लस देण्याचे 'लक्ष्य' निश्चित करण्यात आले होते. मात्र लसीकरण सुरु झाल्यापासून आजतायागत हे लक्ष्य आरोग्य यंत्रणा पूर्ण करून शकलेली नाही. काही दिवस ते हे लक्ष्याच्या जवळ गेले होत मात्र ते लक्ष्य गाठू शकलेले नाही. मात्र आज 1 एप्रिल यापासून 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी मिळाल्याने हे लक्ष्य लवकरच आरोग्य यंत्रणा पूर्ण करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लस आली सध्या लसीकरणाच्या कामासाठीच प्राधान्यक्रम आखण्यात आला होता. यामध्ये सर्व प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांचा समावेश होता. त्यांनतर 1 मार्चला दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात येणार होते. त्यामध्ये जेष्ठ नागरिक (60 वर्षांवरील ) आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयात मोफत लस देण्यात आली आहे. तर खासगी रुग्णालयात त्याकरिता 250 रुपये प्रति लस हा भाव निश्चित करण्यात आला होता. लसीकरण मोहिमेचे सक्षमीकरण अधिक प्रमाणात कशा पद्धतीने करता येईल याचा विचार सध्या करावा लागणार आहे. नागरिकांचा लसीकरणावरील विश्वास वाढेल अशा पद्धतीने राज्याच्या आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच शहारा-शहरात लसीकरणाच्या अनुषंगाने समुपदेशन, माहिती देण्यास सुरुवात केली पाहिजे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांसोबत आरोग्य संवादाचे आयोजन करावे लागणार आहे. चाळीत, गृह निर्माण संकुलात, वाड्या-वस्त्यांमध्ये फिरून लसीचे महत्तव लोकांना पटवून द्यावे लागणार आहे. त्यासाठी काही काळापुरती का होईना तात्पुरत्या स्वरूपाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.
मार्च 22, ला 'सरसकट लसीकरण हवे!' शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, गेल्या वर्षी महाराष्ट्रात कोरोना वेगात पसरत होता तेव्हा आरोग्य आरोग्य यंत्रणेमार्फत दिलासा दिला जायचा, लवकरच या आजाराविरोधातील 'लस' येईल मग या आजारापासून सगळ्याचे रक्षण होईल. त्यावेळी सर्वजण कोरोनाच्या विरोधातील लस कधी येणार याची वाट बघत होते. ज्यावेळी जानेवारी महिन्याच्या मध्यात देशात लसीची आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली. त्यावेळी कोरोना बाधितांच्या आकडा खूप कमी झाला होता. सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्वपदावर आल्या होत्या. त्यावेळी लस घेण्यासाठी फार लोकांच्या मनात किंतु परंतु होते. मात्र नंतर संथ गतीने का होईना पात्र नागरिकांचे लसीकरण सुरु झाले होते. मात्र त्यानंतर काही काळातच कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढू लागला. लसीकरणाचा वेग थोड्याफार प्रमाणात का होईना वाढला. त्यानंतर आता बाधितांचा आकडा एवढा वाढला आहे की, सर्वच स्तरातील नागरिक आम्हाला पण लस द्या अशी मागणी करू लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातून वयाची अट शिथिल करून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना लसीकरण केले पाहिजे असे सूचित करू लागले आहेत. देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी 65 % रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने राज्याला लसीचा अधिक पुरवठा करून या राज्यातील लसीकरणास वेग वाढावा म्हणून लसीकरणासंदर्भातील वयाची अट शिथिल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.
लसीकरणाच्या या मोहिमेत खरे तर प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार असायला हवे. लसीकरण मोहिमेचे सर्व नियंत्रण जर केंद्रातून होत असेल आणि राज्यात सध्या ज्या पद्धतीने रुग्ण वाढ झाली आहे त्यानुसार येथील वैद्यकीय तज्ञांना वाटत असेल लसीकरण 18 वर्षांवरील तरुणांना करावे, तर त्यास केंद्र सरकाने हिरवा कंदील दाखवला पाहिजे. अन्यथा असे होऊ नये, मात्र काही तरुण जर या आजाराने दगावले तर लस असून सुद्धा केवळ वयाच्या अटीमुळे ते घेऊ शकले नाही असे झाले तर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होऊ शकतो. कारण शेवटी लस घेतल्यामुळे नागरिकांना या आजाराच्या विरोधात संरक्षण प्राप्त होणार आहे आणि ते त्यांना वेळेतच प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. लसीकरण मोहिम हा राष्ट्रीय कार्यक्रम असला तर त्याचे नियोजन कशा पद्धतीने ह्यासाठी राज्यांना विशेष अधिकार दिले पाहिजे. केंद्र सरकारला लस सगळ्यांना टप्प्या टप्प्याने द्यायची आहे. हा त्यांचा इरादा नेक असला तरी राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदर 18 वर्षांवरील तरुणांना लस देण्याबाबत केंद्र सरकाने पुन्हा एकदा विचार करायला हवा. या मागणीसाठी राज्य शासनाने केंद्र सरकारडे तगादा लावला पाहिजे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :
- BLOG | मुंबईचा 'कोरोना'!
- BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय..
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?