(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | वायू प्रदूषण विरोधी धोरण हवे!
फटाक्याचा धूर ज्या पद्धतीने विनाशकारी आहे, त्या सोबत अन्य काही गोष्टी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण शहरात होत असते. प्रदूषण या विषयाकडे जितक्या गंभीर पद्धतीने बघणे गरजेचे आहे त्या विषयांकडे आजही राज्यातील जनता गांभीर्याने पाहत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.
>> संतोष आंधळे
कोरोना विषाणूमुळे किमान वायू प्रदूषणवर चर्चा सुरु झाली आणि आपण थेट फटाक्यांच्या बंदीवर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवण्यापर्यंत मजल मारली आहे. हे काही कमी थोडे यश नव्हे, असेच म्हणायला हवे. आरोग्यदायी महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने एक स्वागतार्ह पाऊल आहे. कारण ज्या पद्धतीने संपूर्ण देशात वायुप्रदूषणाची स्थिती आहे. ती अत्यंत विदारक अशीच आहे. फटाक्याचा धूर ज्या पद्धतीने विनाशकारी आहे, त्या सोबत अन्य काही गोष्टी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण शहरात होत असते. प्रदूषण या विषयाकडे जितक्या गंभीर पद्धतीने बघणे गरजेचे आहे त्या विषयांकडे आजही राज्यातील जनता गांभीर्याने पाहत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. प्रदूषण आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी केवळ शासन, प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नसून ती शहरात आणि राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे. आजही आपल्याकडे औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. विशेष करून सर्वच ठिकाणी वापरले जाणारे एअर कंडिशन, वाहतुकीतून निर्माण होणारे प्रदूषण, घरात वापरले जाणारे कॉइल्स, लिक्वीड रिपेलंट, धुम्रपान या सर्व बाबी वायू प्रदूषणात मोठी भर घालतात. यांचे सर्व सामन्यांच्या आरोग्यवर मोठे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे फटाक्यांवर बंदी बरोबरच एकंदरच श्वसन विकाराला बळ देणाऱ्या सर्व गोष्टींचा सर्वसमावेशक विचार करून 'स्वच्छ श्वास' यावर राज्याने एक नवीन धोरणच तयार केले पाहिजे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी किती काळाकरिता कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे, याचा समावेश असणे अपेक्षित असून अशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बनविलेले राज्यातील पहिले धोरण ठरू शकते.
ज्या पद्धतीने देशात काय किंवा राज्यातील प्रमुख शहरात प्रदूषण आहे. त्यामुळे अगोदरच अनेक नागरिक त्रस्त आहेत. श्वसनविकाराचे अनेक रुग्ण दिवाळीच्या काळात शहरे सोडून दुसऱ्या भागात काही दिवसांकरिता मुक्काम हलवीत असल्याचे चित्र तसे जुनेच आहे. मात्र या वर्षाची दिवाळी दरवर्षी पेक्षा वेगळी आहे. याची माहिती प्रत्येकालाच आहे. दिवाळी हा असा एक सण आहे की, तो देशभरात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. दिवाळी म्हटलं की फटाक्याची आतषबाजी आलीच. मात्र या आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि आवाज निर्माण होतो, परिणामी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होते. यंदाची दिवाळी ही कोरोनाच्या सावटाखाली साजरी होत आहे, अजूनही काही नागरिक राज्यातील विविध भागात कोरोनाच्या आजारावर उपचार घेत आहेत. तर परिणामी काही नागरिक रोज दगावत आहे. ज्या पद्धतीने कोरोना आटोक्यात येणे अपेक्षित आहे, तो अजूनही आलेला नाही. राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा आणि खासगी रुग्णालये रुग्ण बरे व्हावेत यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनच्या आजारपणात सर्वात जास्त इजा होते ती फुफ्फुसाला, श्वसन व्यवस्था अगोदर अडचणीत येते. या आजारामुळे अगोदरच अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असतो, त्यात हा फटाक्यांचा धूर मोठा अडसर ठरू शकतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे अपेक्षित असून फटाक्यांवर बंदी ही काळाची गरज ठरणार आहे. देशातील काही राज्यांनी या अगोदरच असा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
फटाक्यांचा कसा कोरोनाशी थेट संबंध आहे तो कसा ते आधी जाणून घेतले पाहिजे. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून सगळ्यांनीच पहिले आहे की, या आजाराचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे श्वसनास त्रास होणे, दम लागणे. या रुग्णांचे रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये गेल्यावर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पहिले शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरच्या आधारे मोजतात. त्यावरून शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली आली असेल तर डॉक्टर त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया चालू करतात. त्यामुळे बहुतांश खासगी आणि शासकीय रुग्णालये जी स्वतंत्र कोरोनाच्या रुग्णाच्या उपचाराकरिता काम करीत होती. त्यांच्या बहुतांश बेडच्या बाजूला त्यांनी कृत्रिम ऑक्सिजन रुग्णाला देता यावा म्हणून व्यवस्था निर्माण करून ठेवण्यात आली आहे. विशेष करून फील्ड हॉस्पिटलमध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती. फटाक्याच्या आतषबाजीमुळे जो धूर निर्माण होतो तो अत्यंत विषारी असून सर्वसाधारण माणसाच्या शरीरात गेला तरी त्याला अस्वस्थ व्हायला होते. श्वसन विकाराच्या रुग्णांना तर हा धूर शरीरात गेल्यास असहाय्य होते. श्वास घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स आणि डेथ ऑडिट कमिटीची बैठक गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. तसेच महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी, पुणे येथील श्वसनविकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, " फटाके बंदी झाली तर स्वागतार्हच आहे. परंतु श्वसन विकाराकरिता अनेक गोष्टी संबंधित आहेत. त्या सर्वच गोष्टीचा वापर करून एक सर्वसमावेशक धोरण राज्याने तयार केले पाहिजे असे वाटते. मच्छरापासून मुक्ती करण्याकरिता घरात ज्या गोष्टी वापरात येतात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात भर टाकतात. त्यांचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे. काही गोष्टी या टाळू शकत नाही मात्र त्याचा वापर कशा पद्धतीने कमी करू शकतो याचा विचार केला गेला पाहिजे. एअर कंडिशन, मोटार गाड्या या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वायू प्रदूषणाला बळ देतात आणि त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. धूम्रपान ह्याने तो व्यक्ती स्वतः तर बाधित होतो मात्र अन्य घरातील आणि सहकाऱ्यांनाही त्याचा त्रास होत असतो. विशेष करून वायू प्रदूषणाची व्याप्ती शहरांमध्ये पाहायला मिळते. अनेक नागरिक येथे दाटीवाटीने राहत असतात. क्षयरोगाचे रुग्ण आपल्याकडे आढळतात. त्यामुळे खरंच स्वच्छ हवा कशी मिळेल याचा विचार प्रशासना सोबत सर्व नागरिकांनीही केला पाहिजे."
2 नोव्हेंबरला , ' कोरोनामय दिवाळी' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन मधील बहुतांश अटी शिथिल करून बऱ्याच प्रमाणात नागरिकांना मोकळीक दिली आहे. नागरिकही त्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. काही दिवसात मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात साजरा होणारा सण दिवाळी तोंडावर येऊन ठेपलाय. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. सध्याच्या घडीला आजही नवीन कोरोनाबाधितांचे रुग्ण सापडत आहेत तर काही प्रमाणात रुग्णांचा मृत्यू दिवसागणिक होतच आहे. राज्य सरकारने मागील काही दिवसात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंतचे सर्व सण साधेपणानेच साजरे केले आहेत. त्याच पद्धतीने दिवाळी सण सुद्धा साजरा करणं अपेक्षित आहे कारण परिस्थिती जरी सुधारत असली तरी ती कायमच तशीच राहील असा दावा कुणीही केलेला नाही. उलट दिवाळी नंतर सुरु होणाऱ्या काळात कोरोनाचा विषाणू कशा पद्धतीने आपले रंग दाखवेल याबाबत स्वतः वैद्यकीय तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यामुळे या दिवाळीच्या काळात सुरक्षितपणे दिवाळी साजरी करणे हेच नागरिकांच्या हातात आहे. युरोप खंडातील परिस्थिती पाहता तेथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून दिवसागणिक नव्याने लाखो रुग्ण सापडत आहेत. ती परिस्थिती पाहता सर्व नागरिकांना यंदाचा दिवाळी सण फटाक्यांशिवाय साजरा केल्यास त्याचा भविष्यात फायदाच होऊ शकतो.
सध्याच्या घडीला आपल्याकडे वायू प्रदूषण विरोधात कायदा आहे. त्यामध्ये शिक्षेची तरतूद आहेच. मात्र एकंदरच ग्लोबल वॉर्मिंगचा होणारा परिणाम पाहता नव्याने एखादे धोरण आखून त्यात सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन वायू प्रदूषणाला कसा आळा घालता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी केल्या तरी वायू प्रदूषणाला आळा बसू शकतो. नागरिकांना आरोग्य साक्षर करून त्यांच्या मार्फतच काही उपक्रम राज्यभर राबविता येईल का याबाबत शासनासोबत सर्वच बिगर शासकीय संस्थानी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कारण जगण्याकरिता प्राणवायू हा लागतच राहणार आहे. मात्र अशा प्रदूषित वातावरणामुळे अशी एक वेळ येईल की, आपल्याला त्याची कमतरता जाणवू शकते, भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन आताच छोट्या प्रमाणात का होईना या लोक चळवळीतून या विषयाला शाश्वत स्वरूप देऊन काम सुरु करण्याची नितांत गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याबाबत काही विचार होऊ शकतो का? याबाबत शासनाने निर्णय घेतला पाहिजे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!