Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातही दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शिक्षकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला.

Kolhapur News: 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटीची अट रद्द करावी. गट मान्यतेसाठीचा जीआर रद्द करावा आणि जुने मानके लागू करावीत. ऑनलाइन आणि शैक्षणिकेतर कामांचा भार शिक्षकांवर टाकणे थांबवावे. शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि नियमित वेतन श्रेणी निश्चित करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. सुधारित खात्रीशीर प्रगती योजना लागू करावी, आदी मागण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. कोल्हापूर जिल्ह्यातही दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शिक्षकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर गेटवर पोलिस आणि शिक्षकांची चांगलीच धक्काबुकी झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेल्यानंतर इतर शिक्षकांना आत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी शिक्षकांनी आम्हाला आत सोडा म्हणत विरोध केला. यावेळी चांगलीच धक्काबुक्की झाली.
आंदोलनाला शिक्षक आमदारकीचा वास!
दरम्यान, आजच्या शिक्षक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पदवीधरचे आमदार जयंत आसगावकर यांच्यासह इच्छूकांनी सुद्धा आंदोलनात भाग घेत एकप्रकारे आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. यावेळी आगामी पदवीधर निवडणुकीसाठी इच्छूक असणारे दादा लाड, भैय्या माने, विजयसिंह माने आणि शरद लाड सुद्धा उपस्थित होते. शरद लाड यांनी घरातील वैचारिक वारशाला तिलांजली देत भाजपशी घरोबा केला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची पुणे पदवीधरमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आमदार अरुण लाड यांचे ते चिरंजीव आहेत. दुसरीकडे, भैय्या माने यांनीही शिक्षक पदवीधरसाठी शड्डू ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे.
महाराष्ट्रातील शाळा आज बंद
दरम्यान, टीईटी सक्तीने शिक्षकांचा संयम अखेर तुटला आहे. शिक्षक रस्त्यावर उतरल्याने महाराष्ट्रातील शाळा आज बंद आहेत. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष तीव्र होईल, असा इशारा राज्यभरातील शिक्षक संघटनांनी सरकारला दिला आहे. दुसरीकडे, शिक्षकांवरील शैक्षणिक नसलेल्या कामाचा भार सातत्याने वाढला आहे. शिवाय, टीईटीची अनिवार्यता अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आणू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 53 वर्षांखालील सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे, ज्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्याचप्रमाणे, गट मान्यता प्रणालीमुळे राज्यातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाळा बंद आंदोलन केले जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. शिक्षकांच्या अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























