एक्स्प्लोर

BlOG | इरफान.. !!

इरफान खान.. त्याचं जाणं अजूनही तमाम इंडस्ट्रीला.. सिनेप्रेमींना पचलेलं नाही. आपण इरफानला त्याच्या कलाकृतीतून पाहिलं. पण इरफान मुंबईत आल्यापासून पडद्यामागचा इरफान जवळून पाहिलाय तो अभिनेते किशोर कदम यांनी. एका संवेदनशील कलाकार-गीतकाराने एका तितक्याच महान कलाकाराला वाहिलेली ही आदरांजली.. 

मी दुबेजींकडे होतो तेव्हाची गोष्ट. मला दुबेजींनी श्याम बेनेगलांना भेटायला सांगितलं होतं. त्यावेळी श्याम बेनेगल भारत एक खोज करत होते. माझ्यासाठी एक व्यक्तिरेखा त्यांच्याकडे होती. त्यांना भेटायला मला गोरेगाव फिल्मसिटीत जावं लागणार होतं. काही करणाास्तव मी श्याम बेनेगलांना जाऊन भेटू शकलो नव्हतो. म्हणजे, दुबेंजींच्या सांगण्यावरून बेनेगलांनी मला भारत एक खोजसाठी भूमिका देऊ केली होती. पण त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी फिल्मसिटीत गेलोच नाही. दुबेजींना हे कळलं तर दुबेजी ओरडणार हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी पुढचे चार दिवस त्यांच्याकडेही गेलो नाही. पण, शेवटी त्यांच्याकडे जावं लागलं. कारण मी दुबेजींकडे गुरू-शिष्य परंपरेतून शिकत होतो. तिकडे गेल्यावर त्यांना मी बेनेगलांकडे न गेल्याचं कळलं. ते भयंकर ओरडले मला. खूप बोलले. इतके की मी रडकुंडीला आलो. सगळं बोलून झाल्यावर मी त्यांना इतकंच म्हटलं की दुबेजी, तिकडे जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. 

मी हे बोलल्यावर सगळीकडे एकदम शांतता पसरली. त्यावेळी बहुधा गणेश यादवही होता. नंतर दुबेजी तासाभराने म्हणाले, कल तुम और गणेश नौकरी पे जाओ. मग मी आणि गणेश गोविंद निहलानी यांच्याकडे नोकरीला गेलो. ती माझी पहिली नोकरी. आम्ही प्रॉडक्शन बघत होतो. निहलानी यांच्याकडे काम करताना आमची जी टीम होती, त्यात सुतोपा जी पुढे इरफानची पत्नी झाली. ती, मी, गणेश आणि संजय उपाध्याय असे चौघे होतो. मी कायम प्रॉडक्शन पाहायचो. गणेश जरा हट्टाकट्टा होता. तो गोविंदजींचा फेव्हरेट होता त्यामुळे त्याला रोलही मिळायचे छोटे छोटे. तर सुतोपा आणि संजयसोबत आम्ही एक दीड वर्ष काम केलं. सुतोपा आधी आली मुंबईत. मग इरफान मुंबईत आला. एनएसडी करून इरफान आला तो थेट गोविंदजींच्या घरीच राहायला आला. त्यावेळी गोविंदजी टेलिफिल्मस करत होते. त्यातल्या एक-दोन टेलिफिल्म्समध्ये इरफानला कामही मिळालं होतं. त्याचं एनएसडीतलं काम बघून खूश होते सगळे. म्हणून त्याला काम मिळालं होतं. तेव्हा इरफान असा बारीक.. कमालीचा उंच असा..मोठे डोळे असलेला असा होता. त्यावेळी गोविंदजी इब्सेनच्या इंग्रजी नाटकावर आधारित जझिरे नावाची टेलिफिल्म करत होते. त्याचं काम राजकमलमध्ये चालू होतं. शूटही राजकमलमध्ये आणि गोविंदजींचं ऑफिसही राजकमलमध्येच होतं. जवळजवळ दिवसातले 14 तास राजकमलमध्येच जायचे आमचे. तर.. गोविंदजींकडे इरफान राहायला आला. मला अजूनही आठवतं.. इरफान तिथे असलेल्या गादीवर पहुडलेला असायचा. कधी काही वाचत असायचा.. त्याला विल्स सिगारेट आवडायची. त्याची ती सिगारेट आणून द्यायाचं काम माझ्याकडे होतं. सेटवरसुद्धा त्याला सिगारेट हवी असेल तर त्याला ती मीच आणून द्यायचो. तेव्हा आमचा असा एक ग्रुप झाला होता. इरफान अभिनय करतो म्हणजे काय करतो हे मी पुन्हा पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. मी कदाचित दुबेजींच्या स्कूलमधून आल्यामुळे मला ती कळली असवी. 

आता मी त्याची ती अभिनयाची प्रोसेस समजून घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की  मला त्याच्या कामाची पद्धत कळत नव्हती. तो करतो म्हणजे नेमकं काय करतो ते कळत नव्हतं. पण रिडींग चालू असताना मला आठवतं.. तो एकदम साधं साधं वाचायचा. साधं म्हणजे प्लेन. म्हणजे विरामचिन्ह आहेत त्याकडे दुर्लक्ष करून तो वाक्य म्हणायचा. दुबेजी म्हणायचे, संवादातून मुद्दाम अर्थ काढू नका. वाक्याचा अर्थ त्या वाक्यात दडलेला असतो. तुम्ही मुद्दाम तो अर्थ काढू नका. वाक्य सगळी प्लेन म्हणायची. फक्त वाक्याच्या शेवटपर्यंत तुमची एनर्जी टिकली पाहिजे, असं दुबेजी सांगत. प्लेन वाचा.. सहज वाचा.. एनर्जी टिकवा असं ते सांगत.  इरफान तसंच वाचत होता. इरफान एनएसडी करून आला होता. आम्हाला वाटायचं, अरे हा इरफान वाचतच नाही. तो सहज बोलल्यासारखा वाचतोय. तो एक्टिंग करत नाहीय, असं वाटे. कॅमेऱ्यासमोरसुद्धा तो सहज असायचा. तो कॅमेरा फ्रेंडली होता. आता तो आधी त्याचं ट्रेनिंग घेऊन आला होता की काय ते माहित नाही. पण तो खूप कॅमेरा फ्रेंडली होता. अतिशय सहज, सटल करायचा तो. तेव्हापासून मी इरफानला पाहात आलो आहे. 

एनएसडीमधून निघालेला अभिनेता जेव्हा मुंबईत येतो तेव्हा त्याला फिल्ममध्येच स्टार व्हायचं असतं. इरफानही त्यासाठीच आला होता. पण त्याला फिल्ममध्ये यश मिळायला 17 ते 18 वर्षं लागली. तोपर्यंत त्याच्यासोबतचे इतर कलाकार प्रस्थापित झाले होते. पण याच्याकडे तितक्या फिल्म्स नव्हत्या. त्याचं शल्यही त्याला असणारच. शिवाय इरफानला घर चालवायचं होतं. त्यासाठी पैसा हवा. मग त्याने टीव्ही मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. त्याने खूप मालिका केल्या. चाणक्य.. चंद्रकांता, भारत एक खोज, श्रीकांत डिटेक्टिव अशा अनेक मालिका केल्या त्याने. डीडीवरच्या मालिकांतही त्याने काम केलं. पण त्या काम करण्यातही त्याची इंटेंन्सिटी, रोल समजून घेणं हे दिसत होतं. इतर टीव्ही कलाकारांमध्ये हा वेगळा दिसायचा.  सिनेमातून त्याला रोल येऊ लागले पण ते दुय्यम, तिय्यम असायचे. 

इरफानला माहीत होतं की तो स्टार घराण्यातला नाही. तो दिसायला हॅंडसम नाहीय. म्हणून त्याने चिकाटी सोडली नाही. 17-18 वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याला यश मिळू लागलं. त्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागलं.असं होतं. कामं मिळू लागली की आत्मविश्वास येतो.  माझ्यासारख्या नटालाही नटरंग, जोगवानंतर आत्मविश्वास मिळाला. इरफानला तिग्मांशू धुलियाच्या हासिलमधून संधी मिळाली. मग त्याने मकबूल केला. हैदर केला नेमसेक केला. लाईफ इन मेट्रो, लंचबॉक्स, हिंदी मिडियम असे अनेक केले. पण हिंदी सिनेमातले जे इतर अभिनेते होते त्यापेक्षा इरफान वेगळा होता. तो संवादांपेक्षा डोळ्यातून बोलायचा असं म्हणतात. ही सगळी कामं बघत असताना तो इरफान असूनसुद्धा प्रत्येक कॅरेक्टर वेगळ वाटायचं. 

अनेकांना माहीत नसेल, पण इरफानचा ह्युमर जबरदस्त होता. त्याचा आपला असा वेगळा टायमिंग सेन्स होता. आपला असा सेन्स ऑफ ह्युमर होता. त्याचे सिनेमे पाहिल्यानंतर मी सुतोपाला फोन करायचो. त्याच्या कामाबद्दल बोलायचो. तेव्हा इरफान म्हणत असे, की आ जाओ कभी घरपर खाना खाने. पण ते जाणं कधी झालं नाही. मी गेलो नाही कधी जेवायला. तर तेव्हापासून इरफानला ओळखतो आहे. दूर राहून त्याचा प्रवास पाहात होतो. इतर स्टारकिड्समध्ये.. इतर घराणेशाहीमध्ये इरफानने 18 वर्षानंतर एकेक दमदार पाऊल टाकत साम्राज्य उभं केलं.

आणखी एक.. त्या दोन टेलिफिल्म्स झाल्यानंतर गोविंदजींनी माझी असिस्टंट डिरेक्टर म्हणून बढती केली. मी सेकंड असिस्टंट डिरेक्टर होतो. त्यावेळी गोविंदजी दृष्टी नावाची फिल्म करत होते. त्यात डिंपल कपाडिया होती. तर त्यावेळी डिंपलसोबत काम करताना  इरफान एकदा कॉन्शिअस झालेला मी पाहिला आहे. सीन असा होता की तो खाटेवर झोपला आहे आणि तो वरून उघडा आहे. डिंपलने केस सोडले आहेत. आणि ती आपले केस त्याच्या पोटावरून चेहऱ्यावरून फिरवते आहे.. असा सीन होता. त्यावेळी इरफान कमालीचा कॉन्शिअस झाला होता. कारण तो रिएक्टच करत नव्हता. त्याची ही स्थिती पाहून डिंपल हसू लागली. त्याला वारंवार विचारल्यानंतर लाजत लाजत त्याने पता नही यार.. क्या हो रहा है.. असं कसंबसं उत्तर दिलेलं मला आठवतंय. 

मला एक वाईट असं वाटतं, दुबेजींकडे काम करत असल्यामुळे नसिरुद्दीन शाह यांचं काम मी विंगेतून पाहिलं आहे. मी नसीर यांच्यासोबत स्टेजवरही काम केलं आहे. मला असं फार वाटे की इरफान आता इतका मोठा झालाय.. तर त्याने माझं काम पाहावं. माझी समर ही फिल्म..  नटरंग,  फॅंड्री त्यानं पाहायला हवं असं वाटत होतं. म्हणजे, माझ्यासारखा क्लॅपर बॉय नट म्हणून पुढे कसा आला हे त्यानं पाहायला हवं होतं असं वाटत राहातं. 

पुढे इरफानला बरं नसल्याचं कळलं. तो उपचारासाठी परदेशात गेला. मला वाटलं होतं की तो बरा होऊन येईल. त्याच्याकडे पैसा होता. सगळी इंडस्ट्री त्याच्यामाागे उभी होती. अनेक लोक परदेशात जाऊन कर्करोगावर मात करून येतात. हाही येईल असं वाटलं होतं. पण नंतर कळलं की त्याला झालेला कर्करोग हा दुर्मिळ आहे. मी एकदा त्याची मुलाखत पाहात होतो तेव्हा त्यानं त्याला जे स्वप्न पडतं ते सांगितलं आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. एका मुलाखतीत त्याला विचारलं आता तुला काय वाटतं? तो म्हणाला, की मला एक स्वप्न पडतं. त्यात मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे. गाडी चालू असते. आणि एकदम टीसी येतो. तो म्हणतो की पुढचं तुझं स्टेशन आहे तुला उतरावं लागेल. मग मी म्हणतो की नाही माझं तिकीट अजून पुढच्या प्रवासाचं आहे. माझा प्रवास दूरचा आहे. हे माझं स्टेशन नाहीय. पण तो टीसी म्हणतो की नाही हेच तुझं स्टेशन आहे आणि इथेच तुला उतरावं लागेल. इरफानची ही वाक्य मी ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं. खरंच करिअरच्या खूप वेगळ्या वळणावर होता इरफान. त्याला हे सगळं अर्धवट सोडावं लागलं. 

मला असं वाटतं की बऱ्याचदा एनएसडीमधून जे कलाकार येतात ते शेवटपर्यंत एनएसडीयन्स असतात. अर्थात ते स्वाभाविक आहे. त्यांचा वेगळा वावर असतो. पण एनएसडीमधून निघालेला प्रत्येक अॅक्टर नसीर नाही होऊ शकत. इरफान नाही होऊ शकत. ओम पुरी नाही होऊ शकत. मग एनएसडी काय करतं?  ते तुम्हाला मार्ग काढून देतात. त्यानंतर तुम्ही तुमची प्रोसेस बाहेर काढायची असते. इरफाननेही एनएसडीचा डांगोरा कधीच पिटला नाही. अभिनयाचे त्याने त्याचे मार्ग शोधले. त्याने त्याचा अनुभव भूमिकांमध्ये घातला. म्हणूनच इरफान आणि इतर एनएसडीयन्स यांच्यात फरक आहे. 

असंच लॉकडाऊन होतं. रात्री काहीतरी लिहून अगदी पहाटे झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी माझ्या रेडियोवर काम करणाऱ्या पत्नीचा सकाळी 11 वाजता फोन आला की अरे इरफान गेला. मी अर्धवट झोपेत होतो. मी स्वप्नात ऐकतोय की खरा ऐकतोय ते मला कळेना. मग मला वाटलं की ज्या इरफानला दृष्टीमध्ये पाहिलं.. ज्या इरफानला मकबूलमध्ये पाहिलं.. नेमसेकमध्ये पाहिलं..अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटात पाहिलं.. तो इरफान आता कधीच दिसणार नाही? तो असा कसा जाऊ शकतो? माझंच काय आख्खी इंडस्ट्री हळहळली. 

इरफान हा भूमिका घेणारा कलावंत होता. त्याचे काही व्हिडिओज पाहिले तर लक्षात येतं की मौलवींसोबतही त्याने वाद घातले आहेत. मी माझ्या नजरेतून देवाकडे पाहीन.. तुम्ही मला सांगू नका देव काय आहे.. असं तो सांगायचा. त्याची ठाम मतं होती. परदेशात भूमिका घेणारे कलावंत असतात. ते राजकीय भूमिका न घाबरता घेतात. इरफानही तसाच होता. तो भूमिका घ्यायचा म्हणून वेगळा ठरत होता. इरफान असा होता.. 

इरफान.. 

(शब्दांकन : सौमित्र पोटे)

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Embed widget