अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
सिंधी आणि गुजराती घरांत पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी कमळकाकडी भाजी अतिशय वेगळ्या चवीची असून भारतातल्या अशाच या काही अनवट भाज्या आहेत.
monsoon vegetables: पावसाळ्यात पालक मेथी अशा बारमाही मिळणाऱ्या भाज्या तर असतातच पण आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक अनवट चवींच्या भाज्या आहेत ज्याच्यापासून चविष्ट पदार्थ केले जातात. अत्यंत औषधी समजल्या जाणाऱ्या आणि अनेक गुणधर्म असणाऱ्या या भाज्यांपासून सुपपासून अगदी लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थही केले जातात. चला जाणून घेऊया या भाज्या
बांबूच्या कोंबाची भाजी
आजकाल राज्यात बांबूच्या लागवडीला मोठं प्रोत्साहन दिलं जातंय. कोवळ्या बांबूंच्या कोंबापासून बनवली जाणारी अगदी वेगळी पण पौष्टीक भाजी कोकणात काही ठिकाणी केली जाते. या चविष्ट भाजीसाठी करावे लागणारे सोपस्कारही बरेच आहेत.कोवळा बांबू सोलून, चिरून तो आठ- दहा तास पाण्यात भिजवून त्याचा उग्रपणा कमी करावा लागतो. त्यानंतर त्याच्या कापापासून ही भाजी करतात. बांबूच्या कंदाचे बारीक तुकडे घालून सूपही केलं जातं. ज्यात अनेक चविष्ट आणि शरिराला उष्ण व हायड्रेट ठेवणारे गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं.
राजगिऱ्याच्या पानांची भाजी
हिरवे लालसर पानं असणारा राजगिरा पावसाळ्यात बाजारातही सहज उपलब्ध होतो. नेहमीच्या पालेभाज्यांसारखीच ही पानं दिसत असली तरी याची चव अगदी विलक्षण असते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही भाजी भरपूर दिसते. सर्वत्र तण म्हणून वाढणाऱ्या या वनस्पतीला हिंदीत चक्क बेशरम असंच नाव आहे!
शतावरीची भाजी आरोग्याला फायद्याची
शतावरी म्हटलं की कुठल्यातरी आयुर्वेदिक दुकानातली चुर्णाची डबी आठवत असली तरी शतावरीची भाजी अनेकजण करतात. हिरव्या रंगाच्या या शतावरीच्या पानांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. या शतावरीचे खाण्याचे आणि शोभेचे असे दोन पानं मिळतात. पण यातील खाण्यायोग्य शतावरीची भाजी अगदी दुर्मिळ आहे.
ओव्याच्या पानांची भाजी
पचनाला उपयुक्त असणारा ओव्याची पानं त्याच्या सुगंधासाठीही ओळखली जातात. या पानांचा कोशिंबीरीत किंवा सॅलडमध्ये वापर होतो.
कमळकाकडीची भाजी
सिंधी आणि गुजराती घरांत पावसाळ्यात आवर्जून खाल्ली जाणारी कमळकाकडी आपल्याला तितकीशी परिचयाची नसते. तळ्यातून किंवा तलावातून आणलेले कमळाचे कंद म्हणजे कमळकाकडी. लक्ष्मी कमळाचे हे कंद या दिवसांतच जास्त मिळतात. मुळ्यासारखे दिसणारे हे पांढरट पिवळसर कंदांपासून ही भाजी बनवली जाते. चवीला अतिशय वेगळी असणारी ही भाजी पीठ पेरून केली जाते. याचे कुरकुरीत चिप्सही बनवले जातात.