kharif sowing : अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.
kharif sowing : यंदा राज्यात चांगला मान्सून होईल अशा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टवर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यात सर्वाधिक 61 हजार हेक्टरवर कपाशी तर 49 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करुन पेरण्या सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर चांगला पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्यानं पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.
यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यानं ऐनवेळी अडचण नको म्हणून नगरच्या कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी 4 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्र
अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. मागील वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळं यंदा कृषी विभागानं जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून यातील 20 हजार 504 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली आहे.
जिल्ह्यात 'या' बियाणांची अधिक मागणी
अहमदनगर जिल्ह्यात खरीपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यांच्या बियाणांची अधिक मागणी असते. सध्या जिल्ह्यात ज्वारी 58 क्विंटल, बाजरी 2 हजार 464, मका 2 हजार 106, तूर 923, मूग 746, उडिद 4 हजार 647,भात 4 हजार 102, सुर्यफुल 20, सोयाबिन 22 हजार 465, कापूस 1 हजार 627 असे 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात खतांची मागणी
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 505 क्विंटल रासायनिक खतांची मागणी झाली होती. यात सरकारकडून 2 लाख 25 हजार 500 क्विंटल रासायनिक खतांच्या आवंटनला मंजूरी देण्यात आली होती. तर 63 हजार 535 क्विंटल खते शिल्लक होती. जिल्ह्यासाठी 63 हजार 216 क्विंटल खते उपलब्ध झाली असून, मागील वर्षीचा साठा आणि उपलब्ध साठा असा जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 781 क्विंटल खतांचा साठा उपलब्ध असून, यातील 67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री झालेली आहे.
हेक्टरनिहाय पेरणी पूर्ण
भात 84 हेक्टर, ज्वारी 40, तूर 15 हजार 128, मूग 23 हजार 682, उडिद 21 हजार 491,बाजारी 24 हजार 588, नागली 4, मका 8 हजार 60, इतर खरीप कडधान्य 4 हजार 110, भूईमूग 13, तीळ 4, सुर्यफूल 110, सोयाबिन 49 हजार 27 आणि कापूस 61 हजार 96, चारा पिक 18 हजार 972 हेक्टर अशी पेरणी झालेली आहे.
महत्वाच्या बातम्या: