शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणं हेच मिशन, पदभार स्वीकारताच काय म्हणाले नवीन कृषीमंत्री?
अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करण हे मंत्रालयाचं मिशन असले पाहिजे, असं वक्तव्य नवीन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केलं.
Union Minister Shivraj Singh Chouhan : अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करण हे मंत्रालयाचं मिशन असले पाहिजे, असं वक्तव्य नवीन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केलं. शिवराज सिंह चौहान यांनी आज अधिकृतरित्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर ते बोलत होते. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल असेही चौहान म्हणाले. 9 जून रोजी पंतप्रधानांसह सरकारमधील नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रीपद दिलं आहे.
पंतप्रधानांनी पहिलाच निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. काल पंतप्रधानांनी पहिलाच निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनेच्या 17 वा हप्ता देण्याच्या निर्णयावर सही केल्याचे चौहान म्हणाले. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल, असे ते म्हणाले. गेली 10 वर्षे रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध होते. आपले मंत्रालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करेल, असेही चौहान म्हणाले.
शेतकरी कल्याणाचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकसंघ म्हणून काम करणार
शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील विविध कार्यालयांना भेट दिली.सफाई कर्मचाऱ्यांसह तिथे विविध स्तरांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकरी कल्याणाचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक संघ म्हणून काम करण्याचे आणि परस्परांच्या सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यांनी मंत्रालयातील कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राला देखील भेट दिली. देशातील पीक उत्पादन आणि दुष्काळ सज्जतेसह कृषी परिदृश्याचा आढावा घेण्यासाठी विविध सुविधांची पाहणी केली.
पदभार स्विकारल्यानंतर कृषीमंत्र्यांनी घेतली मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्विकारल्यानंतर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. मंत्रालयाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली. त्यांनी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा सुपूर्द केला.त्याची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करणे हे मंत्रालयाचे मिशन असले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी रामनाथ ठाकूर आणि भगीरथ चौधरी यांनी देखील कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
महत्वाच्या बातम्या: