मातीमोल दर आणि व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार; नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत
नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. थंडीमुळे पपई पिकत असताना व्यापाऱ्यांकडून पपईची खरेदी होत नाही. राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.
नंदुरबार : राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar district) जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु, उत्तर भारतात पपईला मागणी नसल्याचे कारण देत व्यापारी पपई खरेदी करण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पपईची फळे झाडावरच पिकत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात पपईच्या बागा बहरल्या आहेत. फळे खराब होऊ नये म्हणून कटिंग बॅग लावण्यात आल्या आहेत. सर्व काळजी घेऊन पपई आता तोडणीसाठी तयार झाली आहे. परंतु, पपई खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. शेतकरी तीन रुपये प्रति किलो दराने पपई द्यायला तयार असले तरी खरेदीसाठी कोणी नसल्याने पपईची फळे झाडावरच पिकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
केळीला दर नाही, पपईची पण तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे उत्पादन तरी काय घ्यावे? असा प्रश्न पडत आहे. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात सरकारने पावले उचलावीत अशी अपेक्षा कैलास पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली.
नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी केळीला दर नसल्यामुळे आधीच चिंतेत होता. त्यातच आता जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. व्यापारी पपई तोडणीसाठी येत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे पडलेले दर तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची मनमानी या दुहेरी संकटात असलेल्या जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीनं शरद पवारांना खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडलं : गोपीचंद पडळकर
- ST Strike : एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवारांनी थेट सांगितलं!
- St workers strike : कालच्या बैठकीबाबत नेमकं काय म्हणाले एसटी कृती समितीचे सदस्य