Melon production : वातावरणाच्या बदलामुळं खरबूज उत्पादक शेतकरी संकटात, एकीकडं रोगांचा प्रादुर्भाव तर दुसरीकडं कवडीमोल दर
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे खरबूज पिकावर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी तयार झालेले खरबुजाचे फळ जागेवरच खराब होत आहे.
Melon production : वातावरणातील बदलाचा खरबूज उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे खरबूज पिकावर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी तयार झालेले खरबुजाचे फळ जागेवरच खराब होताना दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटसुद्ध पडत आहे. त्याचा खरबूज पिकासह इतरही पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नितीन नरवटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एकर शेत जमिनीमध्ये खरबूज पिकाची लागवड केली आहे. खरंतर खरबूज हे पीक लागवड करत असताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं असतं. या पिकाची जोपासना करताना वेळेवर पाणी देणं, खतांची मात्रा पुरवणं यासह हवामानाच्या बदलाचा या पिकावर परिणाम होऊ नये म्हणून फवारणीसुद्धा करावी लागते. परंतू यावर्षी खरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कारण ढगाळ वातावरणामुळे खरबुजाच्या पिकावर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तयार झालेले खरबुजाचे फळ खराब होत आहे. तर दुसरीकडे आता बाजारातही या खरबूज फळाची 20 ते 30 रुपये प्रती किलो अशा कवडीमोल दराने विक्री होतेय. त्यामुळे खरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. कारण एकीकडे वादळी वाऱ्यासह होणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे अनेक ठिकाणी होणारी गारपीट. यामुळं उभी पिकं जमिनदोस्त होत आहेत. राज्यातील नांदेड, धुळे, अहमदनगर, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, द्राक्ष, केळी, कांदा, टोमॅटो या पिकांना मोठा फटका बसला आहे.
तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊसाच्या सरी पहायला मिळाल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सकाळपासून अवकाळी पाऊसाच्या सरी बरसल्या. सकाळी सात वाजल्यापासून वीजांच्या गडगडासह पाऊस झाला. अवकाळी पावसानं आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले आहेत. या अवकाळी पावसाचा आंब्याच्या, काजूच्या पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे.