PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
आखाती देशांत लाखो भारतीय नागरिक वास्तव्यास असून अनेक भारतीय पर्यटकही सद्यस्थितीत तेथे अडकले आहेत.

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण (Iran) यांच्यातील संघर्ष थेट युद्धजन्य (War) परिस्थितीवर येऊन पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराण आणि आखाती भागातील देशांमध्ये लढाऊ विमानांचे हल्ले आणि स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचं भारताने स्पष्ट केलं. या संघर्षात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आखाती देशातील दोन प्रमुख नेत्यांशी फोनवरुन संवाद साधला. ओमान आणि कुवेतमधील प्रमुखांना फोन करुन तेथील परिस्थितीची महिती घेतली.
आखाती देशांत लाखो भारतीय नागरिक वास्तव्यास असून अनेक भारतीय पर्यटकही सद्यस्थितीत तेथे अडकले आहेत. त्यामुळे, येथील बदलत्या परिस्थितीवर भारत सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक ते निर्णय घेत राहील, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मोदींनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर आणि येथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा केल्याची प्राथमिक माहिती आहे.
नरेंद्र मोदींनी या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा करताना संबंधित देशांतील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच त्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आणि स्थलांतरणासंदर्भातही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
PM Modi spoke to two important leaders from the Gulf region this afternoon. He had a phone call with Sultan of Oman, Sultan Haitham bin Tarik. He also had a conversation with Crown Prince of Kuwait, Sheikh Sabah Al-Khaled Al-Hamad Al-Mubarak Al-Sabah.
— ANI (@ANI) March 3, 2026
During both discussions,… pic.twitter.com/c0EWhMofLc
भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर
आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, याचीही चिंता केंद्र सरकारने व्यक्त केली. संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना (Advisories) जारी करत आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितलं.

























