Success story: धाराशीवच्या माळरानावर सिताफळाची सेंद्रीय शेती! शेतकऱ्याला 10 लाखाहून अधिक उत्पन्नाची अपेक्षा
संजय बोराडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत फळबाग फुलवली आहे. धाराशिवची जमीन तशी सीताफळाला पोषक असल्यानं त्यांनी सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला.
Success Story: मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हा समजल्या जाणाऱ्या धाराशिवच्या माळरानावर सोयाबीन, ज्वारी, हरभरा अशा पारंपरिक पिकांचीच चलती असा समज आता हळूहळू शेतकरी स्वत:च मोडीत काढताना दिसत आहेत. धाराशिवच्या माळरानावर फळबागांची शेती करत संजय बोराडे या शेतकऱ्यानं जवळपास १० लाखांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे संपूर्णपणे सेंद्रीय शेती करत हा नफा या शेतकऱ्यानं कमवलाय...कमीत कमी खर्चात फळबागांमधून उत्पन्न काढणं तसं जिकीरीचं काम. पण सहा एकरात सिताफळाची जैविक शेती हा शेतकरी करतो.
पारंपरिक शेतीला फाटा
धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड गावातील शेतकरी संजय बोराडे यांची याआधी पारंपरिक शेतीच होती. सोयाबीन, उडीद, तूर, ज्वारी अशी पारंपरिक पिके ते घ्यायचे. २०२० मध्ये त्यांनी ६ एकर जमिनीवर फळबाग करायचा निर्णय घेतला. सरकारच्या भाऊसाहेब फुंडरकार योजनेअंतर्गत सोयाबीनचं आंतरपीक घेत सीताफळ लावले. आता या सीताफळातूनच संजय बोराडेंचं आर्थिक उत्पन्न लाखांच्या घरात आहे.
१५ लाख रुपये कमाईची अपेक्षा
संजय बोराडे यांनी आपल्या फळबागेत ६० टक्के जैविक आणि ४० टक्के रासायनीक खत, फवारण्यांचा वापर केला आहे. या वर्षी त्यांनी आपल्या शेतीत साडेतीन लाख रुपये खर्च केले असून ३० टन सीताफळ येण्याची अपेक्षा केली आहे. १४ ते १५ लाख रुपयांपर्यंत यंदा उत्पन्न निघेल अशी त्यांची आशा आहे. मागे दोन वर्षांपासून ते सीताफळ लावतायत. पहिल्यावेळेस ४ लाख तर दुसऱ्या वेळेस दुप्पट म्हणजेच ८ लाख रुपये उत्पन्न त्यांनी सीताफळातून कमावले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केली शेती
संजय बोराडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत फळबाग फुलवली आहे. धाराशिवची जमीन तशी सीताफळाला पोषक असल्यानं त्यांनी सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जैविक शेती करायचे त्यांनी ठरवले. पारंपरिक पिकांमधून उत्पन्न येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर घेतलेला काहीसा साहसी निर्णय त्यांच्या पक्षात खरा उतरल्यानं आता गावात इतर शेतकऱ्यांनाही जैविक शेतीतून मिळणाऱ्या फायद्याविषयी ते सल्ला देतात.
हेही वाचा: