Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
shrigonda constituency: श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई. भाजप उमेदवार बदलणार
अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपकडून नगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha) भाजपने बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती. मात्र, पाचपुते दाम्पत्य हे त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु, भाजप नेतृत्व प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले होते. परंतु, आता या निर्णयात बदल होण्याची शक्यता आहे.
यासाठी पाचपुते दाम्पत्य रविवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीही पाचपुते दाम्पत्य मुलाला उमेदवारी मिळावी, ही मागणी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उमेदवार बदलण्यास नकार दिला होता. मात्र, आता पाचपुते दाम्पत्य उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुलाच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा लॉबिंग करणार आहेत. श्रीगोंद्यात भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला तरी फटका बसणार नाही. उलट मतांची संख्या वाढेल, असा विश्वास बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुवर्णा पाचपुते यादेखील उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होत्या. मात्र, भाजप नेतृत्त्वाने जयश्री पाचपुते यांच्या पारड्यात दान टाकल्यानंतर त्या नाराज झाल्या होत्या. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली जाते, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे आता भाजपने उमेदवार बदलून विक्रमसिंह पाचपुते यांना रिंगणात उतरवल्यास सुवर्णा पाचपुते काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
अकोल्यात काँग्रेस पक्षात बंडखोरी
राज्यातील काँग्रेस बंडखोरांना थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधील राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडमधील डॉ. जिशान हुसेन यांनी बंडखोरी केलीये. त्यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेत पक्षाला आव्हान दिले आहे.
अकोला पश्चिममधून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिलीये. साजिद खान पठाण यांचा 2019 च्या निवडणुकीत फक्त 2593 मतांनी पराभव झाला होताय. दरम्यान, डॉ. जिशान हूसेन यांची समजूत घालण्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मात्र, आपण फार पुढे निघून गेलो आहोत. त्यामुळे माघारीचा प्रश्नच नसल्याचा वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी स्पष्टपणे काँग्रेसला सांगितले आहे.
कोण आहेत जिशान हुसेन ?
* जिशान हुसेन यांचे आजोबा असगर हुसेन अकोल्याचे सलग दोनदा खासदार.
* वडील प्रा. अजहर हूसेन शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री. अकोल्यातून दोनदा विजयी.
* डॉ. जिशान हुसेन मावळत्या अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेते.
# डॉ. जिशान अकोल्यातील ख्यातनाम डॉक्टर.
# राहूल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील चेहरा
आणखी वाचा