केळी आणि पपई पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.
Agriculture News : नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. कारण केळी आणि पपईची रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे.
पिकाच्या लागवडीसोबत संगोपनाचा खर्च मोठा
तीव्र तापमान आणि विविध आजारांमुळे केळीच्या आणि पपईच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर मर होत असल्याचे चित्र सारंखेडा परिसरात दिसत आहे. यावर्षी पपईचे रोप 14 रुपयांपासून तर 16 रुपयांपर्यंत आहे. तर केळीचे रोप हे 15 ते 17 रुपयापर्यंत असून, शेतकऱ्यांनी विकत घेऊन लागवड केली आहे. मात्र, पिकाच्या लागवडीसोबत संगोपनाचा खर्च मोठा आहे. मर रोगामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मर रोगाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) पाच जूनला आलेल्या वादळाचा (Hurricane) सर्वाधिक फटका केळी बागांना बसला आहे,. काढणीसाठी आलेले केळीचे (Banana Crop) घड खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमीनदोस्त झालेली केळी खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर शेतकऱ्यांनी केळी गुरांना चारा म्हणून टाकली आहेत. एकट्या शहादा तालुक्यात जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जळगावसह नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं क्षेत्र
जळगावसह नंदुरबार, धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता मान्सूनच्या तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उत्पादित केलेली केळी ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या वादळात उद्धवस्त झाली आहे. वादळ इतके भीषण होते की शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे. तर वादळामुळे पडलेल्या केळीला खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. .
महत्त्वाच्या बातम्या: