पीक विमा घोटाळा! सातबारा नांदेडचा अन् विमा काढला बीडचा; शेतकऱ्यांमध्ये खळबळ
Crop Insurance Scam : खोटी कागदपत्रे दाखवून विमा काढण्यात आल्याचे गैरप्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
Crop Insurance Scam : शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) फायदा मिळावा म्हणून, सरकारने एक रुपयात विम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र, आता याच पीक विम्याचा घोटाळा (Scam) देखील समोर येत आहे. खोटी कागदपत्रे दाखवून विमा काढण्यात आल्याचे गैरप्रकार आता समोर येऊ लागले आहेत. असाच काही प्रकार नांदेड जिल्ह्यात देखील समोर आला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर सातबारा नांदेडचा (Nanded) अन् विमा बीड (Beed) जिल्ह्याचा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्यात खरीपाच्या पिक विम्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडच्या अर्धापूरातील शेत जमीनीचा विम्मा चक्क बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढला आहे. हा विमा बनावट कागदपत्रे तयार करून काढण्यात आला असून, या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन देखील तहसीलदारांना आणि विमा कंपनीच्या कार्यालयात देण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात राज्य शासनाने एक रुपयात विमा योजना लागू केली. यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि क्षेत्रात वाढ झाली आहे. पण या योजनेचा दुरोपयोग होत असल्याचे समोर आलय. अर्धापूर येथील शेतकरी संभाजी माटे यांची अर्धापूर शिवारात गट क्रमांक 379 मध्ये तीन हेक्टर, 11 आर शेतजमीन आहे. मात्र, मोटे जेव्हा विमा काढण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, त्यांच्या तीन हेक्टर अकरा आर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा बीड जिल्ह्यातील परमेश्वर बालासाहेब सानप यांच्या नावाने विमा काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना विमा काढता आला नाही. या सर्व प्रकारानंतर त्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.
मला विम्याचा लाभ मिळावा, शेतकऱ्याची मागणी...
माझ्या शेतीचा परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून विमा काढण्यात आला आहे. त्यामुळे मी तहसील कार्यालयात तक्रार केली असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच मला विम्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील केल्याचं शेतकरी संभाजी माटे यांनी म्हटले आहे.
सर्वाधिक विमा बीड जिल्ह्यात...
खरीप हंगामात बीड (Beed) जिल्ह्यातील 18 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा (Crop Insurance) भरला आहे. त्यामुळे सात लाख 91 हजार हेक्टरवरील पिके संरक्षित झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी संरक्षित क्षेत्रात वाढ झाली आहे. तर पिक विमा भरण्याचा बाबतीमध्ये कृषी विभागाने अधिक प्रयत्न केल्याने पिक विमा भरण्यात बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जिल्हा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: