Pune Porsche Car Accident : अल्पवयीन Vedant Agarwal दारु कशी मिळाली? पब मालकाला अटक!
पुणे : शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील हायप्रोफाईल कार दुर्घटनेमुळे (Accident) समाजमन हादरुन गेलंय. गर्भश्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन जणांचा जीव घेतला. विशेष म्हणजे हा कारचालक मुलगा अल्पवयीन असल्याने न्यालायानेही त्यास तत्काळ जामीन मंजूर केला. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गरिबांचा जीव एवढा स्वस्त झालाय का, गरिबाच्या मुलांना काही किंमत नाही का, बड्या उद्योगपतींना कायद्याची भीती नाही का, पोलीस प्रशासन (Police) बड्या उद्योगपतींसाठी एवढं मवाळ का, असे अनेक प्रश्न या अपघाताच्या घटनेनंतर विचारले जात आहेत. त्यानंतर, राज्य सरकारही याप्रकरणी गंभीर झाले असून गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पुण्यात पोहोचले आहेत. फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन पोलिसांसोबत बैठक घेतली. त्यामुळे, पुण्यातील घटनेवर गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी कारचालक वेंदात अग्रवाल यास पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर, त्यास पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपी कारचालकास पिझ्झा व बर्गर आणून दिल्याचंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्यामुळे, या घटनेनवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुण्यातील तरुणाई एकत्र येत अपघाताच्या घटनेचा आणि पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवत आहे. समाजातील विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकार गंभीर झालं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन संवाद साधला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही दबाव न झुगारता कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणी राजकीय दबाव न झुगारता कारवाई करा, असे निर्देशच पुणे पोलिसांना दिले आहेत.