Varsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special Report
वर्षा बंगला... राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. पण शपथविधीच्या दोन महिन्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर गेलेले नाहीत. याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली होती. वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगं पुरल्याची चर्चा असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊतांनी सकाळी सकाळीच या विषयाला पुन्हा हवा दिली. तर वर्षावरचं शिफ्टिंग का लांबतंय, याचं कारण सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आज दिवसभरात याबाबत नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.
हसावं की रडावं असा प्रश्न पडण्यासारखाच हा विषय आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वर्षा बंगल्यावरची काळी जादू, लिंबांच्या टोपल्या आणि मंत्रतंत्रांची जोरदार चर्चा रंगली होती.
आता या चर्चेत रेड्याच्या शिंगांची एन्ट्री झालीय.
बरं, हा रेडा आणि त्याची शिंगं ही महाराष्ट्रातली नाहीत.
गुवाहाटी दौऱ्यावरून आणलेली ही शिंगं सध्या वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली असल्याचा दावा राऊतांनी केलाय.
तोदेखील अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याच्या डिस्क्लेमरसह..
एरवी राऊतांच्या प्रत्येक टीकेला शिंगावर घेणाऱ्या शिंदेंनी याबाबत मात्र संयमित प्रतिक्रिया देत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केलीय.
ठाकरे आणि शिंदेंमध्ये सध्या 'शिंगं विरुद्ध लिंबं' असा सामना रंगल्याचं चित्र आहे.
राऊतांनी वर्षावर पुरलेली 'शिंगं' काढल्यानंतर महायुतीचे नेते ठाकरेंच्या काळात सापडलेली 'लिंबं' बाहेर काढताना दिसतायत.
तर हा तंत्रमंत्राचा मुद्दा आजचा नसून मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय.
तर छगन भुजबळांना या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द उच्चारण्याचीही गरज पडली नाही.
गंमत एवढीच की गेल्या दीड महिन्यांपासून नाराज असणारे भुजबळ या शिंगांच्या निमित्तानं को हाईना, दिलखुलास हसताना दिसले.
थोडक्यात काय, तर पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात 'रेड्याची शिंगं विरुद्ध टोपलीभर लिंबं' असा सामना रंगलाय.
तर दिवसभर ही चर्चा रंगल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री माध्यमांसमोर आले आणि त्यांनी वर्षावरचा मुक्काम लांबण्यामागचं खरं कारण जाहीर केलं.
रेड्यांच्या शिंगांचा उल्लेख करून राऊतांनी दिवसाची सुरुवात केली.
येड्यांचा बाजार म्हणत फडणवीसांनी या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.
आता तरी लिंबं, काळी जादू, रेडे आणि शिंगांची चर्चा थांबून जनतेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेते बोलू लागतील, हीच अपेक्षा.
All Shows

































