Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 जागांवर महाविकास आघाडी (MVA) यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. जवळपास 17 जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याची चर्चा आहे. त्याचवेळी विदर्भातील 7 जागांवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आपापले दावे करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी सांगितले. याशिवाय उद्या महाविकास आघाडीच्या जागांचे वाटपही होणार आहे.
दरम्यान, प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसेल, अशी चर्चा रंगली असतानाही भाजपने पहिली उमेदवारी जाहीर करून बाजी मारली आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये 99 जणांना संधी देताना 89 आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीमध्ये असलेला गुंता अजूनही कायम आहे. जागावाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली आहे. विशेष करून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून चांगलाच वाद पेटला आहे. त्यामुळे एक प्रकारे मुंबईपासून दिल्लीपर्यंत दोन्ही पक्षात वादाच्या ठिणग्या पडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटते की काय? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.