लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
मुक्ताईनगरमध्ये आपले मोठे स्वागत पाहून आपण भारावलो, येथे गर्दीचा महासागर आहे, लाडक्या बहिणी वीस नोव्हेंबरला काम करतील, दिवाळी आली आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) बंद होणार नाही, असे म्हणत आम्ही नोव्हेंबरचे पैसेही आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टाकल्याचं एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) म्हटलं. तर, येथील भाषणात लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री गुलाबराव पाटील व चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. महायुती उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजय झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या तिन्ही पक्षाचे झेंडे त्यांच्या हाती दिले आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले.
मुक्ताईनगरमध्ये आपले मोठे स्वागत पाहून आपण भारावलो, येथे गर्दीचा महासागर आहे, लाडक्या बहिणी वीस नोव्हेंबरला काम करतील, दिवाळी आली आहे, विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायला लागले. 23 तारखेला चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके फुटतील, ते बाळासाहेब यांच्या विचाराचे आहेत, कडवड स्वभावाचे आहेत, माझ्यावर पणं ते रागवतात, त्यांच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आपण दिला, आपण देणारा मुख्यमंत्री आहे. लाडकी बहीण योजना सुरू करायची म्हटलं तर अनेकांना हा चुनावी जुमला वाटला, मात्र महिलांच्या खात्यावर पैसे आले, आपण एकदा ठरवले तर आपण स्वतःचे पणं ऐकत नाही, महिलांच्या नावावर पैसे आल्याने विरोधक अफवा पसरवू लागले आहेत. बुरी नजर वाले तेरा मुह काला, पैसे परत जातील म्हणून सांगू लागले, आम्ही मात्र नोव्हेंबरचे पैसे ही अगोदरच दिले आहेत. आता समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काही जणांनी याला कोर्टात नेले, मात्र कोर्टाने त्यांच्या थोबाडीत दिली, आपण आचारसंहिता अगोदर योजना आणली, ही योजना कायम राहणार आहे, त्याचं नियोजन केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही
मी गरिबी पहिली आहे, म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचं. कोणी मायका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, तुम्ही ताकद दिली तर दोन हजार, तीन हजार रुपये देण्यात येतील. देण्याची दानत महायुती सरकारमध्ये आहे, मला बहिणी लखपती झालेल्या पहायचं आहे, असेही एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटले.
मुक्ताईचे दर्शन घेऊन प्रार्थना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईचे दर्शन घेतले असून. यावेळी बळीराजाला सुखी ठेव ,सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव, सर्व गोरगरिबांचे चांगले दिवस येऊ दे ,हे मुक्ताईला साकडे घातले आहे हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षात एवढी प्रकल्प आपण केली, उद्योग आणले, कल्याणकारी योजना आणल्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणल्या की, या कामाची तुलना महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आणि दोन सव्वा दोन वर्ष महायुतीचे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. यावेळी मुक्ताई संस्थांनच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वांचे महायुतीत स्वागत
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर होता, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले की सर्वांचे महायुतीत स्वागत आहे.