(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे. जागावाटपाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत यादी सुद्धा काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जाणार नाही.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे (Thackeray Faction) गटामध्ये होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. दरम्यान, जागा वाटपामध्ये आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेतला आहे. जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात उद्या मुंबईमध्ये येणार आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत यादी सुद्धा काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
अनेक नावांवरती काँग्रेसकडून शिक्कामोर्तब
आता बाळासाहेब थोरात यांच्या एन्ट्रीनंतर तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ संपतो का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान आजच्या बैठकीनंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, आजची बैठक व्यवस्थित पार पडली. अनेक नावांवरती काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये काँग्रेसची यादी जाहीर होईल. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकारी समितीची पुन्हा एक बैठक होणार असून त्यानंतर बाकीची नावं अंतिम केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपावरून तिढा आहे असं म्हणता येणार नाही
समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे त्याबाबतीत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे यांनी मला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मी उद्या (22 ऑक्टोबर) त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जागावाटपावरून तिढा आहे असं म्हणता येणार नाही. मात्र, चर्चा होईल आणि चर्चेतून बाहेर निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्याच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात त्यांना विचारलं ते म्हणाले की उद्या दुपारी एक वाजता महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. मात्र, उद्या दुपारी तीन वाजता आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसणार आहोत.
विदर्भामधील जागांवरून वाद टोकाला
विदर्भामधील जागांवर ठाकरे गट अडून बसल्याने काँग्रेस आणि ठाकरेंमधील वाद टोकाला गेला आहे. विदर्भात ठाकरे गटाकडून 14 जागांची मागणी करण्यात आली आहे, पण काँग्रेस त्या सोडण्यास तयार नाही. त्यामुळे विदर्भ कोणाचे संस्थान नाही म्हणत संजय राऊत यांनी तोफ डागली होती. त्यानंतर बैठकीत नाना पटोले असल्यास सहभागी न होण्याचा सुद्धा पवित्रा ठाकरेंकडून घेण्यात आला होता. त्यानंतर दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे दाखवले होते. मात्र, आज काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावरुन आता वाद अधिक चिघळणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या