Kolhapur Uttar Vidhan Sabha : खासदार धनंजय महाडिकांच्या मुंबईत भेटीगाठी सुरु असतानाच कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला!
राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूर : उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे, पण आपली उमेदवारी गेल्या अडीच वर्षापूर्वीच फायनल झाली असून, येत्या 28 तारखेला शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून (Kolhapur Uttar Vidhan Sabha) अर्ज भरणार असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हटले आहे. क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी.
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला न्याय दिला
क्षीरसागर म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला न्याय दिला. कोल्हापूरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. लाडकी बहीण सारख्या योजनेतून महिलांचे सक्षमीकरण केले. मुलीना मोफत शिक्षण, महिलांना एसटी प्रवासात निम्मे तिकीट, वृद्धांना वयोश्री योजना अशा योजना राबविण सर्वसामान्यांचे सरकार चालविले. हेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सिद्ध करते. या योजनांसह कोल्हापूर शहराच्या विकासात होणारी भर या कामांची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचा. निश्चितच शिवाजी पेठ आणि शिवसेनेचं नातं असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ शिवाजी पेठेतून रोवली गेली आणि आजही शिवसेनेचा धनुष्यबाणच शिवाजी पेठवासीयांच्या मनावर कोरला गेला आहे यात शंका नाही. त्यामुळे गांधी मैदान, रंकाळा तलाव आदी प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेच्या आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे ध्येय आपण ठेवले असून, हे ध्येय पूर्ण करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.
राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूर उत्तरच खर उत्तर आहेत
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र आम्ही जपला आहे. त्याचपद्धतीने राजेश क्षीरसागर यांचे काम सुरु आहे. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय इतर लाटण्याचा प्रयत्न करतात पण कोल्हापूरच्या जनतेसमोर त्यांचे पितळ उघडे पडत आले आहे. टीका-टिप्पणी पेक्षा कामाला महत्व देणारे राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूर उत्तरच खर उत्तर आहेत. त्यांना शिवाजी पेठ परिसरातून प्रचंड बहुमताने मताधिक्य देवू, अशी ग्वाही दिली.
खासदार महाडिकांच्या भेटीगाठी सुरुच
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर आजही (21 ऑक्टोबर) महाडिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरमधून आणि शिराळा मतदारसंघासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत, तर शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्यासाठी धनंजय महाडिक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारी संदर्भात महाडिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून खासदार महाडिक आणि राजेश क्षीरसागरमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या