Siddheshwar Yatra Solapur : श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा मुख्य विधी असलेला अक्षता सोहळा उत्साहात पार
महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचं मुख्य विधी असलेला अक्षता सोहळा आज पार पडला. हजारो सिद्धेश्वर भक्तांनी हा अभूतपूर्व असा सोहळा याची देही याची डोळा अनुभवाला. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळं केवळ मोजक्या लोकांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले होते. यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने हजारो भाविक मोठ्या उत्साहात या यात्रेत सहभागी झाली. राजकीय नेत्यांची मंदियाळी देखील या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली. सोलापूरचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी बाराबंदी घालून या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सप्तनिक या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यंदा पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा देखील या सोहळ्याला उपस्थित होता. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रसासकीय अधिकारी देखील पारंपरिक बाराबंदी वेशात या यात्रेत सहभागी झाले