विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही टाकलाय डाव
गत निवडणुकीत शिवसेनेतून निवडणूक लढवलेल्या येथील नेत्या रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला.
सोलापूर : विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित झाल्यानंतर आता प्रचाराला गती मिळाली आहे. बड्या नेत्यांच्या सभांसह मतदारसंघात कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे, आपल्या मतदारसंघात कोण जिंकणार, कोण बाजी मारणार याची उत्कंठा आणि चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यातील करमाळा (Karmala) मतदारसंघात यंदाही तिरंगी लढत होत आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ शिवसेनाला सुटला असून शिवसेना (Shivsena) महायुतीचे उमेवार म्हणून दिग्विजय बागल यांना तिकीट देण्यात आलंय. तर, लोकसभा निवडणुकीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या नारायण पाटील यांना महाविकास आघाडीने उमेदवारी देत शरद पवारांनी डाव टाकलाय. तर, विद्यमान आमदार संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
गत निवडणुकीत शिवसेनेतून निवडणूक लढवलेल्या येथील नेत्या रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी उमेदवारीवर चर्चा केली होती. त्यामुळे, रश्मी बागल यांनाच तिकीट मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. करमाळा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी रश्मी बागल यांनी केली होती. मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध पाहायला मिळाला. मात्र, ऐनवेळी दिग्विजय बागल यांचा शिवसेना पक्षप्रवेश करुन त्यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे.
2019 च्या निवडणुकीत काय घडलं?
गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय शिंदे विरूद्ध नारायण पाटील (दोन्ही अपक्ष) आणि रश्मी बागल (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय पाटील कृष्णराव यांना तिकीट देण्या आलं होतं. मात्र, अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी 5,494 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांना समर्थन दिलं. सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून दिग्विजय बागल यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, दिग्विजय बागल यांचा काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत पक्षप्रवेश करुन त्यांना तिकीटा देण्यात आलं आहे. तर, विद्यमान आमदार संजय शिंदे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, यंदाही येथे तिरंगी लढत पाहायला मिळत आहेत. येथील तिरंगील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लोकसभेला मविआला करमाळ्यातून मोठं मताधिक्य
यंदाच्या 2024 लोकसभा निवडणुकांमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 8 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, भाजप-सेना युतीचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 असे एकूण 10 आमदार सोबत असतानाही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 41,511 मतांचं मताधिक्य मिळालं आहे. करमाळ्यातून संजय शिंदे व बागल गटाने रणजीतसिंह पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर, नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांसाठी प्रचार केला होता.