Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
Sharad Pawar : शरद पवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्याला सरकार बदलण्याचा निकाल घ्यावा लागेल, असं म्हटलं.
हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे प्रचारसभेला संबोधित केलं. आजची ही सभा एका दृष्टीनं ऐतिहासिक सभा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक दहा दिवसांवर आलीय. राज्याचा कारभार योग्य लोकांच्या हातात द्यायचा निकाल या निवडणुकीत आपल्याला करायचा आहे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवार म्हणाले, आपण बघितलं देशाची सत्ता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे होती. लोकांच्या अपक्षा होत्या, लोकांच्या अपेक्षांची पूर्तता हवी तशी झाली नाही. त्याचा परिणाम कालच्या लोकसभा निवडणुकीत दिसला. लोकसभा निवडणुकीत तुम्ही लोकांनी जबरदस्त शक्ती दाखवली. मोदी साहेबांच्या हातात देशाच्या लोकसभेची सगळी सत्ता होती.त्याच मोदी साहेबांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. ते सांगत होते चारसो पार , चारशे लोक मला हवेत. महाराष्ट्रासारख्या पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या. एवढा मोठा धक्का बसला होता. पण, सहा महिन्यांपूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये 48 पैकी 31 खासदार तुम्ही लोकांनी आम्हा लोकांची निवडून दिले आणि इतिहास निर्माण केला, असं शरद पवार म्हणाले.
बळीराजाकडे दुर्लक्ष केल्यानं मोदींना मित्रांची मदत घ्यावी लागली
मोदींना स्वत:च्या ताकदीवर सरकार बनवणं शक्य नव्हतं. त्यांनी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची साथ घेतली आणि कसंबसं सरकार आज सत्तेवर आलं. हे का झालं या देशामध्ये कोट्यवधी लोकांच्या दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सोडवणारा बळीराजा आहे, त्याच्या प्रश्नांकडे मोदींच्या राजवटीत दुर्लक्ष करण्यात आलं, असं शरद पवार म्हणाले.
शेतमालाची किंमत द्यायची नाही. खतं औषधांची किंमत वाढवायची, जगाच्या बाजारपेठेत शेतमाल पाठवायचा निकाल घेतला तर त्याच्यावर बंधनं आणायची. असे अनेक कार्यक्रम त्यांनी जे घेतले ते शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात होते. एका बाजूला शेतकरी संकटात आणि या देशातील तरुण पिढी, शिकलेल्या पिढीच्या हाताला काम द्यायचं नाही ही भूमिका मोदींच्या राजवटीत होती, असं शरद पवार म्हणाले.
सरकार बदलण्याचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
आम्ही लोक सांगत होतो, संसदेत सांगत होतो. शेतकऱ्याचं घर असेल घरात दोन मुलं असतील तर एकानं नोकरी करावी, दुसऱ्यानं शेती करावी. आज दुसराही नोकरी करायला तयार आहे. त्याच्या घामाची किंमत देण्याची संधी आजचे सरकार देत नाही. यात बदल करण्यासाठी सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर नाही. त्यामुळं सरकार बदलायचं काम आपल्याला करायचं आहे.
आपण जयप्रकाश दांडेगावकर, नांदेड उत्तरला संगीता पाटील आणि रुपाली ताई गोरेगावकर या सगळ्यांना मोठ्या मतांनी विजयी करणं आपलं कर्तव्य आहे, असं शरद पवार म्हणाले. महालक्ष्मी योजनेतून दरमहा तीन हजार रुपये, महिला आणि मुलींना संरक्षणासोबत एसटी प्रवास मोफत, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, जातिनिहाय जनगणना, आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, बेरोजगार तरुणांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत चार हजारांची मदत देणार आहोत. आजारी व्यक्तींना उपचारांसाठी 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :