Omicron : ओमायक्रॉन जीवघेणा नाही, ओमायक्रॉनचा शोध लावणाऱ्या आफ्रिकेतील डॉक्टरांचं मत
देशात या आधी आलेल्या कोरोनाच्या दोन लाटानंतर आता ओमायक्रॉनच्या रुपात तिसरी लाट येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतलं मृत्यूतांडव आपण सगळ्यांनी अनुभवलंय. त्यामुळे नुकतंच भारतात शिरकाव केलेल्या ओमायक्रॉनबद्दल नागरिकांच्या मनात भीतीसोबतच अनेक प्रश्नही आहेत. पण सगळ्या भीतीच्या छायेत ओमायक्रॉनबद्दल काहीशी दिलासादायक आणि चिंता कमी करणारी माहिती समोर येते. ओमायक्रॉन जीवघेणा नाही, त्याला घाबरुन जाऊ नका असं डॉ. अँजेलिक कोएत्झी (Angelique Coetzee) यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील ज्या डॉक्टरांनी ओमायक्रॉन या कोरोनाचा नवा व्हेरियंट शोध लावला त्या टीमपैकी डॉ. अँजेलिक कोएत्झी या एक आहेत.
डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या की, "कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट 'डेल्टा' व्हेरियंटपेक्षा घातक नाही. 'डेल्टा' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा ओमायक्रॉन बाधितांमध्ये सौम्य लक्षणं आढळतील. लहान मुलांमध्ये ओमायक्रॉन संसर्गाचं प्रमाण हे कमी आहे. टेस्टिंग, लसीकरण आणि बूस्टर डोस तसेच लहान मुलांचं लसीकरण या गोष्टींमुळे भारतातील ओमायक्रॉनचा प्रसार रोखणं शक्य आहे."
डॉ. अँजेलिक कोएत्झी या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. कोएत्झी यांच्या टीमनंच सर्वात आधी कोरोनाचा हा नवा व्हेरियंट शोधून काढला होता. त्या देशातल्या लसीवरील संशोधनाच्या सल्लागार समितीतही त्यांचा समावेश आहे.
सध्या जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची दहशत आहे. दक्षिण आफ्रिकेतून जगातल्या अनेक देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे. भारतातही काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातही या नव्या व्हेरियंटबाबत सतर्कता बाळगली जात आहे.
कोरोनाचे आतापर्यंत अल्फा, बीटा, डेल्टा हे व्हेरियंट जगानं पाहिले होते. त्यात डेल्टा व्हेरियंटनं सर्वात जास्त धुमाकूळ घातला. जगभरात लसीकरण सुरु झालं आणि कोरोनाच्या या व्हेरियंट्सचा प्रभाव कमी झाला. पण ओमायक्रॉन आला आणि पुन्हा जगासमोर एक आव्हान निर्माण झालं. शास्त्रज्ञांच्या मते, ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा जीवघेणा नाही. पण असं असलं तरी त्याचा प्रसार हा इतर व्हेरियंट्सपेक्षा वेगानं होतो. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं, लस घेणं आणि सतर्क राहणं महत्वाचं आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
