Sanjay Raut Full Pc : मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाही
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील जनतेचा नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीवर जितका राग नसेल तितका राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे सूडाचे दळभद्री राजकारण केले, त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत त्यांना मोजावी लागली. 'मी पुन्हा येईन', 'मी दोन पक्ष फोडून आलो', असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते. पण आज त्याच दोन पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
आमच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कटुता आहे, यासाठी तेच कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात बदल्याचं, सूडाचं राजकारण केले. हे तुमचं फडतूस राजकारण आहे. लोकांनी संधी मिळाल्यावर याचा बदला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसांच्या स्वाभिमानाला नख लावण्याचं काम केले. हातातील सत्तेचा वापर चुकीच्या मार्गाने केला. त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांवर सूड उगवला. अनेक खटल्यांमध्ये फडणवीसांची टोळी न्यायमूर्तींनी घरी बोलावून त्यांच्यावर दबाव आणत होती. या टोळीकडून पोलिसांवर दबाव आणण्यात आला, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
राज्यातील जनतेचा मोदी-शाहांवर राग नाही तेवढा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा आणि अकोला मतदारसंघ सोडला तर विदर्भात फडणवीसांचा भाजप रसातळाला गेला. यासाठी देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.