Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE
Delhi Vidhan Sabha Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे याआधीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आप पक्षाला यावेळी दिल्लीकरांनी चांगलाच ठेंगा दाखवला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरात भाजपाकडून जल्लोष केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील दिल्लीतील विजयानंतर तेथील भाजपाच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीदेखील दिल्लीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी दिल्लीच्या निकालावर बोलताना मुंबई महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास व्यक्त केलाय. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल अण्णा हजारेंना विसरले. त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे.आता 'आप'दा टळली आहे आणि दिल्लीवरचं संकट दूर झालं आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यांची भोवळ्याची हॅटट्रिक झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांना विकास हवा, योजना हव्या
तसेच, केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्प सादर केला.घरोघरी लक्ष्मीची पावलं उमटावी म्हणून केंद्राने अनेक योजना आणल्या. या निवडणुकीच्या माध्यमातून देश आर्थिक महासत्ता होईल यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला. इंडिया आघाडी जेव्हा जिंकते तेव्हा सगळं चांगलं. इंडिया आघाडीचा पराभव झाला की संस्था भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला जातो. शिव्या देणं चालू होतं. लोकांना काम हवं आहे. कल्याणकारी योजना हव्या आहेत. लोकांना विकास हवा असतो, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.























