Delhi Election Result 2025 : दिल्लीत आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधणार की 27 वर्षांनंतर भाजपचं पुनरागमन
Delhi Election Result 2025 नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा (Delhi Assembly Election Results 2025) आज निकाल लागणार आहे. दिल्ली कोणाची यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान झालं. आता आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी कांटे की टक्कर झालीय. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आप हॅटट्रीक साधणार की भाजप आपचा वारू रोखणार असा सवाल दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला पडला आहे.
दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलंय. केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय. एक्झिट पोलचा अंदाज पाहता भाजप सत्तेत येईल असा कयास आहे. मात्र दिल्लीकरांनी कोणाला कौल दिलाय हे प्रत्यक्ष मतमोजणीतच समजेल. आठ वाजता आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल. दरम्यान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी निकालाआधी लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा देखील केली.























