Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू
US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
मुंबई : भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) सध्या जोरदार चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे रोहन बोपण्णाने यूएस ओपनमध्ये (US Open) इतिहास रचला आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम मोडला, जो 2016 ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळला तेव्हा 43 वर्षे आणि चार महिन्यांचा होता.
एज इज जस्ट अ नंबर
रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेन (Matthew Ebden) या जोडीने पियरे-ह्युजेस हर्बर्ट (Pierre-Hugues Herbert)आणि निकोलस माहूत (Nicolas Mahut) या फ्रान्सच्या जोडीला 7-6 (3), 6-2 पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील सामना 1 तास 34 मिनिटं रंगला. परंतु 43 वर्षे आणि 6 महिने वयाच्या रोहन बोपण्णाने 'एज इज जस्ट अ नंबर' असल्याचं सिद्ध केलं.
सेमीफायनलमधील विजयानंतर रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. सोबतच त्याने विश्वविक्रमही केला. रोहन बोपण्णा याच्यापूर्वी, या वयात (43 वर्षे 6 महिने) इतर कोणत्याही पुरुष खेळाडूने (एकेरी किंवा दुहेरी ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठलेली नाही. त्यामुळे अंतिम फेरी गाठणं ही रोहन बोपण्णाची ऐतिहासिक कामगिरी आहे.
दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक
दरम्यान रोहन बोपण्णाने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 2010 मध्ये त्याचा पाकिस्तानी साथीदार इसम-उल-हक कुरेशीसह यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यानंतर बोपण्णा-कुरेशी यांची जोडीला ब्रायन बंधूंनी पराभूत केलं होतं.
अंतिम फेरीत कोणाशी सामना?
दरम्यान, रोहन बोपण्णा आज (08 सप्टेंबर) कारकिर्दीतील दुसरी ग्रॅण्डस्लॅम फायनल खेळणार आहे. विशेष म्हणजे ही ग्रँडस्लॅम फायनल तो हार्ड कोर्टवर खेळणार आहे. अंतिम फेरीत बोपण्णा-एबडेन जोडीचा सामना तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या राजीव राम आणि ग्रेट ब्रिटनच्या जो सॅलिसबरी यांच्याशी होणार आहे.आर्थर ऐश स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. राजीव राम आणि सॅलिसबरी या जोडीने दोन वेळा यूएस ओपन पुरुष डबल्सचं जेतेपद पटकावलं आहे.
यंदा इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीची विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक
सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडी बोपण्णा आणि एबडेन यांनी या वर्षात आतापर्यंत दोन विजेतेपदं पटकावली आहेत. या जोडीने फेब्रुवारीमध्ये कतार ओपन आणि मार्चमध्ये इंडियन वेल्सच्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. दोघांनीही जुलैमध्ये विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. इंडियन वेल्समध्ये एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला.