एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
19 वर्षात 12 शस्त्रक्रिया, तरीही नेहरा खेळत राहिला!
एक वेगवान गोलंदाज म्हणून एकोणीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणं हे खरोखरच सोपं नाही.
मुंबई: आशिष नेहरा, भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज... वय अवघं 38 वर्षे. खरंतर या वयात वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाचेक वर्षही लोटलेली असतात. पण आशिष नेहरा आजही खेळतोय.
न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या टी ट्वेण्टी सामन्यात खेळून, नेहरी क्रिकेटला अलविदा करणार आहे.
आशिष नेहराने भारतीय संघाची पांढरीशुभ्र जर्सी पहिल्यांदा परिधान केली तो दिवस होता दिनांक 24 फेब्रुवारी 1999. त्या वेळी त्याने श्रीलंका दौऱ्यातल्या कोलंबो कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या निमित्ताने नेहरा टीम इंडियाची निळी जर्सी पुन्हा परिधान करेल, त्यावेळी त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला प्रवास एकोणिसाव्या वर्षात दाखल झालेला असेल.
या एकोणीस वर्षांत नेहरा हा प्रामुख्याने मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली अशा आठ कर्णधारांचं वेगवान अस्त्र म्हणून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर कोसळत राहिला.
आता विराट कोहलीचं नाव निघालंच आहे म्हणून हे छायाचित्र पाहा. 2003 सालातल्या या छायाचित्रातले हे दोन्ही चेहरे तुमच्या ओळखीचे आहेत. या छायाचित्रात चोवीस वर्षांचा आशिष नेहरा पंधरा वर्षांच्या विराट कोहलीला गौरवताना दिसत आहे. त्या काळात नेहराने दक्षिण आफ्रिकेतला विश्वचषक चांगलाच गाजवला होता. त्यामुळे दिल्लीतल्या एका स्थानिक स्पर्धेचं पारितोषिक वितरण त्याच्या हस्ते झालं होतं. त्याच पारितोषिक वितरणातलं हे छायाचित्र नेहरा विराट कोहलीला शाबासकी देतानाचं. आज तोच विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाच्या निवडीत तो आशिष नेहराला हक्काने मागून घेतो आहे.
आशिष नेहरा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला आजवरचा अखेरचा सामना खेळला तो एक फेब्रुवारी 2017 रोजी. इंग्लंडविरुद्धच्या त्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यानंतर नेहरा यंदा आयपीएलमध्येही खेळला, पण तिथंच त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
एक वेगवान गोलंदाज म्हणून एकोणीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणं हे खरोखरच सोपं नाही. या एकोणीस वर्षांत नेहराला तब्बल बारा शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळेच त्याच्या पुनरागमनाचा सिलसिला कौतुकास्पद ठरतो.
आशिष नेहराने आजवरच्या कारकीर्दीत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर कसोटीत 44, वन डेत 157 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत 34 विकेट्स आहेत, पण आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची भूक भागलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या वयावर कितीही विनोद झाले तरी त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि ते योग्यही आहे. कारण टीम इंडियाच्या कर्णधाराला जोवर तुमच्या क्षमतेवर विश्वास आहे, तोवर इतराची फिकिर कशाला करायची?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement