(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीम इंडियाच्या 'या' रणनितीमुळे इंग्लंडला रोखण्यात यश
सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.
केनिंग्टन ओव्हल (लंडन) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे राहिला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था सात बाद 198 अशी झाली. सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने एकही विकेट गमावली नव्हती. मात्र चहापानानंतर भारतील संघ नव्या रणनितीसह मैदानात उतरला आणि सामन्यात पुनरागमन केलं. जलद गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली.
इंग्लंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रवींद्र जाडेजाने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणत दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजानं म्हटलं की, "सुरुवातीला कोणतीही विकेट मिळाली नाही, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्याच्या रणनितीवर आम्ही काम केलं. मोईल अली आणि अॅलिस्टर कूक यांच्या भागिदारीदरम्यान सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. मोईल अली आणि कूकला धावा न करु दिल्यास ते दबावात येतील, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे चुकीचे शॉट खेळून ते अडचणीत येतील असा अंदाज आम्ही बांधला आणि तसंच झालं."
"चहापानानंतर अवघ्या 50 धावांच्या आत इंग्लंडच्या सहा विकेट आम्ही घेतल्या. इंग्लंडमध्ये एक विकेट मिळाली की 2-3 विकेट सलग मिळतात हे आम्हाला माहिती होतं", असं जाडेजा म्हणाला.
भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. शमीला विकेट मिळाली नाही मात्र भेदक गोलंदाजी करत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणला. त्यामुळे भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली.
संबंधित बातम्या
'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न