आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा राहुल आवारे भारतीय संघात
राहुल आवारेनं सोनीपतमधील निवड चाचणीत दिल्लीचा नवीनकुमार आणि हरियाणाचा रवींद्र या दोन्ही पैलवानांना हरवण्याची कामगिरी बजावली. राहुल आवारे हा गेले चार महिने महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षकपदाचं प्रशिक्षण घेत आहे.
मुंबई : महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय पैलवान राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. नवी दिल्लीत येत्या 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत आशियाई कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी हरियाणातील सोनीपत येथे भारतीय संघाच्या निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निवड चाचणीत राहुल आवारेनं फ्रीस्टाईल शैलीच्या 61 किलो वजनी गटासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं.
राहुल आवारेनं सोनीपतमधील निवड चाचणीत दिल्लीचा नवीनकुमार आणि हरियाणाचा रवींद्र या दोन्ही पैलवानांना हरवण्याची कामगिरी बजावली. राहुल आवारे हा गेले चार महिने महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षकपदाचं प्रशिक्षण घेत आहे. आगामी आशियाई कुस्ती स्पर्धेच्या सराव आणि सहभागासाठी त्याला नाशिकमधल्या प्रशिक्षणातून खास सूट देण्यात आली होती. त्याचाच लाभ उठवून राहुलनं निवड चाचणीवर वर्चस्व गाजवलं.
राहुलनं गेल्या दीड वर्षांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक आणि जागतिक कुस्तीचं कांस्यपदक अशी दुहेरी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आगामी आशियाई कुस्ती स्पर्धेतही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या सुवर्णपदकाने राहुल आवारेला महाराष्ट्र शासनाच्या सेवेत थेट पोलीस उपअधीक्षक म्हणून सामावून घेण्यात आलं आहे.
राहुल आवारे हा मूळचा बीडचा पैलवान असून, त्याच्या गुणवत्तेला हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार यांनी पहिल्यांदा पैलू पाडले. बिराजदारमामांच्या निधनानंतर राहुल आवारे काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे.