Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण केलं अन् पृथ्वीराज गदा कुशीत घेऊन झोपला; फोटो व्हायरल
Maharashtra Kesari 2022 : पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरी. अंतिम सामन्यात विशाल बनकरवर 5-4 ने मात, 21 वर्षानंतर कोल्हापुरात मानाची गदा
![Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण केलं अन् पृथ्वीराज गदा कुशीत घेऊन झोपला; फोटो व्हायरल Maharashtra Kesari Kusti Competition 2022 After Fulfilled Maharashtra Kesari dream winner Prithviraj Patil slept near trophy Gada in his hand Photo Viral Maharashtra Kesari 2022 : महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण केलं अन् पृथ्वीराज गदा कुशीत घेऊन झोपला; फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/10/73c08dba343af623c165f0dfefb1d04c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Kesari 2022 : आपण सगळेच स्वप्न पाहतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो. आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मनाला जे समाधान मिळतं ते काही औरच... असंच काहीसं दिसून आलंय महाराष्ट्राची मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज पाटीलच्या (Prithviraj Patil) बाबतीत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश मिळाल्यानंतर कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याच सर्वत्र कौतुक होतंय. पण सध्या त्याची सर्वात जास्त चर्चा होतेय ती, त्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यानंतर पृथ्वीराज रात्री मिळालेल्या मानाच्या गदेला बिलगून झोपला. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तब्बल 21 वर्षांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोल्हापूरकडे गेलं. कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावलीय अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्यानं 5-4 नं मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला. मैदानात पृथ्वीराजचे कुटुंबीय उपस्थित होते. पृथ्वीराजच्या विजयानंतर त्याची आई आणि आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. आई आणि आज्जीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आज्जीनं गर्दीतच नातवाचे मटामटा मुके घेतले. त्यानंतर सर्वांनी मिळून पृथ्वीराजचा विजय साजरा केला.
घरीही पृथ्वीराजचं जंगी स्वागत झालं. स्वप्न सत्यात उतरवून निवांत झोप घेण्यासाठी पृथ्वीराज पलंगावर पडला. पण तरी त्यानं मानाची गदा मात्र सोडली नाही. मानाची गदा कुशीत घेऊन पृथ्वीराज निवांत झोपला. पृथ्वीराजचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.
कोण आहे पृथ्वीराज पाटील?
आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत. दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्याने 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे.
दरम्यान, साताऱ्यातल्या शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना झाला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाईंसह बरेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींनीही तोबा गर्दी केली होती. पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)