(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रिकेटच्या नियमानुसार बटलर आऊटच, काय आहे नियम आणि 'मंकड' विकेट म्हणजे काय?
कसोटी क्रिकेटमध्ये आजवर चार वेळा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन फलंदाज मंकड विकेटचे बळी ठरले आहेत.
जयपूर : पंजाब आणि राजस्थान यांच्यात काल झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विननं राजस्थानच्या जोस बटलरला अनोख्या पद्धतीनं धावचीत केलं होतं. क्रिकेटच्या परिभाषेत याला 'मंकड' विकेट असं म्हटलं जातं. मात्र अश्विनच्या या रनआऊननंतर त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. मात्र खेळाच्या नियमानुसार बटलरला आऊट केल्याचं अश्विनने म्हटलं.
अश्विननं स्वत:च्याच गोलंदाजीवर नॉन स्ट्राईकिंग एन्डला असलेल्या बटलरला चलाखीनं धावचीत केलं. तिथेच हा सामना पंजाबच्या बाजूनं झुकला. त्यामुळे अश्विनच्या कृतीला अखिलाडूपणाचं लेबल लावून बटलरची विकेट वादग्रस्त ठरवण्यात येत आहे. पण क्रिकेटच्या नियमावतील नियम क्रमांक 41.16 नुसार बटलर हा बादच असल्याचं सिद्ध होतं."My actions were within cricket's rules, can't be called unsporting." - @ashwinravi99 responds to accusations of him unfairly running out @josbuttler. #RRvKXIP #VIVOIPL pic.twitter.com/ygOmyGTzCL
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019
क्रिकेट नियम क्रमांक 41.16
या नियमानुसार गोलंदाजानं चेंडू टाकल्याशिवाय नॉन स्ट्रायकर एन्डचा फलंदाज क्रीझ सोडू शकत नाही. जर फलंदाजानं क्रीझ सोडली आणि गोलंदाजानं यष्ट्या उडवल्या तर फलंदाजाला रनआऊट घोषित केलं जातं.
काय आहे 'मंकड' विकेट?
भारताचे माजी कसोटीवीर विनू मंकड यांनी पहिल्यांदा नॉन स्ट्रायकर एन्डच्या फलंदाजाला अनोख्या पद्धतीनं बाद केलं होतं. 13 डिसेंबर 1947 रोजी सिडनी कसोटीत विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला स्वत:च्या गोलंदाजीवर धावचीत केलं होतं. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे या विकेटला मंकड विकेट हे नाव पडलं.
कसोटी क्रिकेटमध्ये आजवर चार वेळा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन फलंदाज मंकड विकेटचे बळी ठरले आहेत. जॉस बटलर मंकड पद्धतीने बाद होणारा आयपीएलमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे.