IPL 2020 | विराट यंदा तरी... 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार?
एक ना अनेक असे कितीतरी विक्रम विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या नावावर आहेत. पण गेल्या 12 मोसमांपासून या संघाला विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.
IPL 2020 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि त्यानंतर आयपीएलमध्ये जास्त लोकप्रियता मिळवणारा संघ कोणता असेल तर तो आहे विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराट आणि त्याचे शिलेदार आज संध्याकाळी होणाऱ्या सज्ज झाले आहेत. पण यंदाही आरसीबीच्या चाहत्यांचा एकच सवाल आहे, विराट यंदातरी...
अनेक विक्रम, पण विजेतेपदाची पाटी कोरी. आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज.. आरसीबीचा विराट कोहली. स्पर्धेत सर्वात मोठ्या फरकानं विजयी झालेला संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. सर्वाधिक तीन वेळा दहा विकेट्स राखून सामना जिंकणारा संघ... रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. एक ना अनेक असे कितीतरी विक्रम विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या नावावर आहेत. पण गेल्या 12 मोसमांपासून या संघाला प्रतीक्षा आहे ती विजेतेपदाची.
संघाची 'विराट' बाजू
कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स हे दोघेही संघाचे महत्वाचे शिलेदार आहेत. दोघांनीही आयपीएलच्या मैदानात धावांचा रतीब घातलाय. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीवरच संघाच्या विजय-पराभवाचं समीकरण ठरतं. पण क्रिकेट हा एकट्या दुकट्याचा खेळ नाही. इथं जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी महत्वाची ठरते. आणि इथेच बंगलोरचा संघ नेहमीच मागे पडलाय. फलंदाजीत चांगली कामगिरी करुनही अनेकवेळा सुमार गोलंदाजीमुळे आरसीबीला हातातोंडाशी आलेली विजयाची संधी गमवावी लागली आहे. त्यामुळे गोलंदाजीत सुधारणा हे विराट आणि संघव्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान असेल.
यावर्षी इतिहास बदलेल?
बंगलोरनं आयपीएलच्या गेल्या बारा मोसमात दोन वेळा फायनलचं दार ठोठावलं होतं. पण 2009 साली डेक्कन चार्जर्स आणि 2016 साली सनरायझर्स हैदराबादनं बंगलोरकडून विजेतेपदाची संधी हिरावून घेतली होती. गेल्या तीन मोसमात तर बंगलोरची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली. 2017 आणि 2019 च्या आयपीएलमध्ये हा संघ सर्वात तळाच्या म्हणजेच आठव्या स्थानी होता. तर 2018 साली बंगलोरला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.
बंगलोरची सलामी आज दोन वेळच्या आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सनसारख्या दिग्गजांचा भरणा असलेल्या या संघाविरुद्ध दोन हात करुन विराटसेना यंदाच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करेल. पण आरसीबीच्या चाहत्यांची एक इच्छा असेल... यंदा तरी बंगलोरला विजेतेपद मिळावं हीच... घोडामैदान जवळच आहे.. पाहूयात तर मग