(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs Australia | रोहित शर्माचा नवा विक्रम, जलद 9 हजार धावांचा टप्पा पार
रोहित शर्माने वनडे कारकिर्दितील आपल्या 9 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात जलद 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित तिसरा खेळाडू ठरला आहे.
बंगळुरु : बंगळुरु वन डेत रोहित शर्माने दुहेरी विक्रमाची नोंद केली. रोहितने या सामन्यात आपल्या वन डे कारकीर्दीत 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर त्याने 128 चेंडूत 8 चौकार आणि सहा षटकारांसह 119 धावांची खेळी उभारली. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे 29 वं शतक ठरलं. या कामगिरीसह त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकत सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली. या यादीत सचिन तेंडुलकर सर्वाधिक 49 शतकांसह पहिल्या, विराट 43 शतकांसह दुसऱ्या तर रिकी पॉन्टिंग 30 शतकांसह तिसऱ्य़ा स्थानावर आहे.
रोहित शर्मा जलद 9 हजार धावांचा टप्पा पार करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 194 डावांत 9 हजार धावांचा टप्पा पार केला होता. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डीविलियर्सने 208 डावांत 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर रोहितने 224 सामन्यात 217 डावांत 9 हजार धावांचा टप्पा पार केला.
9 हजार धावा पूर्ण करणारे इतर भारतीय खेळाडू
सचिन तेंडुलकर - 18 हजार 426 धावा सौरव गांगुली - 11 हजार 221 धावा राहुल द्रविड 10 हजार 768 धावा महेंद्र सिंह धोनी - 10 हजार 599 धावा मोहम्मद अझरुद्दीन - 9 हजार 378 धावाऑस्ट्रेलिया विरोधात सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर - 9 शतकं रोहित शर्मा - 8 शतकं विराट कोहली - 8 शतकं
रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि 15 चेंडू राखून पार केलं. विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी साकारली. रोहितने 119 तर विराटने 89 धावांची खेळी केली. त्याआधी स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 286 धावांची मजल मारली होती. स्मिथने कारकीर्दीतलं नववं वन डे शतक साजरं करताना 131 धावांची खेळी केली. याशिवाय मार्नस लाबुशेननेही 54 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानं दोन तर कुलदीप यादव आणि नवदीप सैनीनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या