(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नॉटिंगहॅम कसोटीवर भारताची मजबूत पकड, इंग्लंडसमोर 521 धावांचं लक्ष्य
विराट कोहलीचं शतक तसेच चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने 352 धावांवर घोषित केला.
नॉटिंगहॅम : नॉटिंगहॅम कसोटीवर टीम इंडियाने आपली पकड आणखी घट्ट केली आहे. विराट कोहलीच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर आता 521 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
विराट कोहलीचं शतक तसेच चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दुसरा डाव भारताने 352 धावांवर घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या. भारताला इंग्लंडच्या दहा विकेट घेत सामना जिंकण्यासाठी पुढचे दोन दिवस आहे.
ट्रेंट ब्रिजचा रेकॉर्ड पाहिला तर आजवर कोणत्याच संघाला 300हून अधिक धावांचं लक्ष पार करता आलेलं नाही. त्यामुळे पावसाने घात न केल्यास तिसरी कसोटी जिंकून मालिकेतील आपलं आव्हान कायम राखण्याची मोठी संधी टीम इंडियाला आहे.
कर्णधार कोहलीचं दमदार शतक तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार विराट शतक तीन धावांनी हुकलं होतं. मात्र विराटनं दुसऱ्या डावात शतक झळकावलं. विराटनं 196 चेंडूंत दहा चौकारांसह 103 धावांची खेळी उभारली. कसोटी कारकिर्दितील विराटचं हे 23वं शतक आहे. चेतेश्वर पुजाराच्या साथीनं 113 धावांची भक्कम भागीदारीही विराटनं रचली.
विराटचं इंग्लंड दौऱ्यातील हे दुसरं शतक आहे. या शतकानंतर विराट आणि स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्मानं एकमेकांना फ्लाईंग किस देऊन तो क्षण साजरा केला.