Ayatollah Ali Khamenei: आता इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी टार्गेट? तेहरानमध्ये थेट कार्यालयाजवळ इस्त्रायल अन् अमेरिकेचा संयुक्त हल्ला
फार्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जम्हूरी यांसारख्या वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या भागांना लक्ष्य करण्यात आले. आकाशात धुराचे लोट दिसून आले.

Joint Israeli US Attack In Tehran: इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त कारवाई करताना इराणची राजधानी तेहरानवर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा वणवा अधिक पेटला आहे. अमेरिकेशी अणुकरारावरून बोलणी सुरु असतानाच इस्त्रायल आणि अमेरिकेनं कारवाई करत दबाव वाढवला आहे. पहिली चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर कारवाईचा धाक दाखवून करार करून घेण्याची अमेरिकेची खेळी असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. 'फार्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जम्हूरी यांसारख्या वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या भागांना लक्ष्य करण्यात आले. आकाशात धुराचे लोट दिसून आले.
सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाजवळ निशाणा
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 'असोसिएटेड प्रेस'ने (AP) दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलचे हल्ले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या ( Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei) कार्यालयाजवळ झाले आहेत. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल काट्झ यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. "इस्त्रायलवरील धोके वेळीच ओळखून ते नष्ट करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक (Preemptive) कारवाई करण्यात आली आहे." अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही देशांत हाय अलर्ट आणि विमानसेवा बंद
दरम्यान, इराणकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण इस्त्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यात आले आहेत. इस्त्रायली लष्कराने जनतेला संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्रायलच्या विमानतळ प्राधिकरणाने सर्व नागरी उड्डाणांसाठी हवाई हद्द बंद केली असून, प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. इराण आणि इस्त्रायलमधील अनेक वर्षांच्या 'छुप्या युद्धाचे' आता उघड युद्धात झालेलं रूपांतर असल्याची चर्चा आहे. तेहरानच्या मध्यवस्तीत झालेले स्फोट केवळ मालमत्तेचे नुकसान करणारे नसून, इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे. आता इराण याला लष्करी प्रत्युत्तर देणार का? याकडे लक्ष असेल.
हल्ल्यात अमेरिकेच्या मोठ्या विमानवाहू जहाजांचाही सहभाग
इराणवरील हल्ल्यापूर्वी अमेरिकेने त्यांचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज, यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड, इराणला पाठवले. हे अणुऊर्जेवर चालणारे विमान आहे.हे विमान देखील हल्ल्यात सहभागी होते. अब्राहम लिंकन वाहक आणि इतर युद्धनौका आधीच तैनात आहे. याव्यतिरिक्त, अलिकडच्या आठवड्यात अनेक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, लढाऊ विमाने आणि देखरेख विमाने देखील मध्य पूर्वेत पाठवण्यात आली आहेत.
50 अमेरिकन लढाऊ विमाने मध्य पूर्वेत दाखल
अमेरिकेने गेल्या आठवड्यात 50 हून अधिक लढाऊ विमाने मध्य पूर्वेत पाठवली. स्वतंत्र उड्डाण-ट्रॅकिंग डेटा आणि लष्करी विमान वाहतूक मॉनिटर्सनी मध्य पूर्वेकडे जाणारी असंख्य एफ-22, एफ-35 आणि एफ-16 लढाऊ विमाने रेकॉर्ड केली आहेत. यापैकी काही विमाने आधीच मध्य पूर्वेत उतरली आहेत, विशेषतः इस्रायली हवाई तळांवर (बेन गुरियन आणि ओव्दा), जिथे अमेरिकन एफ-22 विमाने दिसली आणि लँडिंगची नोंद झाली.
इतर महत्वाच्या बातम्या
























