एक्स्प्लोर
Advertisement
यंग टीम इंडियाचा बिनीचा शिलेदार, पाणीपुरी विकणाऱ्या मुलाची 'यशस्वी' वाटचाल
यशस्वी जैस्वालच्या शतकानं भारताला सलग तिसऱ्यांदा अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारुन दिलीय. क्रिकेटच्या वेडापायी मुंबईत आलेल्या यशस्वीला राहायला देखील जागा नव्हती. त्याच यशस्वीनं आज आपल्या संघर्षावर मात करत मोठं यश मिळवलंय.
मुंबई : मुंबईच्या यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकानं भारतीय अंडर नाईन्टिन संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं. गेली अनेक वर्ष मुंबई क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणारा यशस्वी आता भारतीय युवा संघासाठीही महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. अठरा वर्षांचा यशस्वी क्रिकेटच्या वेडापायी सात वर्षांपूर्वी मुंबईत आला. आणि त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे.
यशस्वी जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली. त्यावेळी या स्वप्ननगरीत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. पण हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात यशस्वीनं पोटापाण्यासाठी आझाद मैदानावर पाणीपुरीही विकली. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही.
यशस्वी जैस्वालच्या या संघर्षात प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची मिळालेली साथ मोलाची ठरली. त्यांनी यशस्वीतल्या गुणवत्तेला न्याय मिळवून दिलाच पण त्याच्या डोक्यावर छप्पर येईल असा हक्काचा आसराही मिळवून दिला. ज्वाला सिंग यांनी दिलेल्या या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला आणि मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये यशस्वीनं आधी रिझवी हायस्कूलचं नाव मोठं केलं आणि मग मुंबई क्रिकेटच्या वयोगट क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली.
आज भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघात आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवणाऱ्या यशस्वी जैस्वालचा आजवरचा हा सारा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीशी एकाकी संघर्ष करण्याची त्यानं दाखवलेली जिद्द भविष्यातही त्याला घवघवीत यश मिळवून देईल यात शंका नाही.
आज अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारल्याचा तमाम भारतीयांचा आनंद द्विगुणित झाला कारण यशस्वी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानचा चक्क दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या मुंबईकरांनी रचलेली 176 धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. यशस्वीचं नाबाद शतक तर भागिदारीचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 113 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 105 धावांची खेळी उभारली. तर दिव्यांशनं 99 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी करुन त्याला छान साथ दिली.
यंदाच्या विश्वचषकात यशस्वीनं साकारलेली ही आणखी एक मोलाची खेळी ठरली. त्यानं सलमीवीर म्हणून या विश्वचषकात पाच सामन्यात 156 च्या सरासरीनं 312 धावांचा रतीब घातलाय. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
पाणीपुरी विकून टीम इंडियात एन्ट्री, यशस्वीचा संघर्षमय प्रवास
मुंबईचे युवा पिढीतले पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे संघाचे शिलेदार बनले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन यशस्वीनंही अंडर नाईन्टिन क्रिकेट गाजवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद शतकानं त्यानं आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवून दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement