एक्स्प्लोर
मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती; किक्रेटसाठी अकराव्या वर्षी सोडलं होतं घर
पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे 13 वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यात मुंबईचा फलंदाज यशस्वी जैस्वाल करोडपती झाला आहे.
मुंबई : मुंबईचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या लिलावात चक्क करोडपती झाला आहे. खरं तर यशस्वीनं त्याच्या वयाची 18 वर्षेही अजून गाठलेली नाहीत. त्यामुळं मतदानाचा अधिकार आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी त्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण त्याच यशस्वीला त्याच्या क्रिकेट गुणवत्तेनं आयपीएलमध्ये तब्बल दोन कोटी 40 लाख रुपयांची बोली मिळवून दिली.
पृथ्वी शॉ, शिवम दुबे यांच्यानंतर आता मुंबईच्या यशस्वी जैस्वालला मिळालंय आयपीएलचं व्यासपीठ...
आयपीएलसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सनं यशस्वी जैस्वालला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. तेही थोडीथोडकी नाही तर तब्बल दोन कोटी 40 लाख रुपयांची बोली लावून. यशस्वीच्या वयाचा हिशोब मांडायचा झाल्य़ास तो अॅडल्ट म्हणजे 18 वर्षांचा व्हायला अजूनही काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळं मतदानाचा अधिकार मिळण्याआधीच मुंबई क्रिकेटचा हा नवा हीरो चक्क करोडपती बनलाय.
पृथ्वी शॉनं 2017 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि त्याचा टीम इंडियाच्या दिशेनं प्रवास सुरु झाला. शिवम दुबेनंही गेल्याच मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि तोही भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे संघाचा शिलेदार बनला. यशस्वी जैस्वालनं तर आयपीएलमध्ये पदार्पण होण्याआधीच देशातलं अंडर नाईन्टिन क्रिकेट गाजवायला सुरुवात केली आहे. आज तो भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघाचा बिनीचा शिलेदार आहे. यशस्वीनं विजय हजारे करंडकात द्विशतक झळकावून नुकतीच आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली.
पृथ्वी श़ॉ आणि शिवम दुबे यांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वी जैस्वाल टीम इंडियात स्थान मिळवेल का हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे. पण पृथ्वी आणि शिवम यांच्या तुलनेत यशस्वीच्या यशाची कहाणी ही खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे.
यशस्वी जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली. त्यावेळी या स्वप्ननगरीत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. पण हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात यशस्वीनं पोटापाण्यासाठी आझाद मैदानावर पाणीपुरीही विकली. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही.
यशस्वी जैस्वालच्या या संघर्षात प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची मिळालेली साथ मोलाची ठरली. त्यांनी यशस्वीतल्या गुणवत्तेला न्याय मिळवून दिलाच पण त्याच्या डोक्यावर छप्पर येईल असा हक्काचा आसराही मिळवून दिला. ज्वाला सिंग यांनी दिलेल्या या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला आणि मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये यशस्वीनं आधी रिझवी हायस्कूलचं नाव मोठं केलं आणि मग मुंबई क्रिकेटच्या वयोगट क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली.
आज भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघात आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवणाऱ्या यशस्वी जैस्वालचा आजवरचा हा सारा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीशी एकाकी संघर्ष करण्याची त्यानं दाखवलेली जिद्द भविष्यातही त्याला घवघवीत यश मिळवून देईल यात शंका नाही.
हेही वाचा - IPL 2020 : तब्बल 7.75 कोटींची बोली लागल्यामुळे शिमरॉन हेटमायरचा जोरदार डान्स
MIG | एमआयजी क्लबला यंदाच्या पोलीस शिल्डचा मान I ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement