US Capitol Violence | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?, जो बायडन म्हणाले...
राष्ट्रपती निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी युएस (US Capitol) कॅपिटलमध्ये प्रवेश करुन गोंधळ घातला होता. आता त्यासाठी ट्रम्प (Donald Trump) यांना जबाबदार ठरवण्यात येत असून त्यांच्यावर महाभियोग चालवला जाण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी युए कॅपिटलमध्ये घातलेल्या गोंधळानंतर अमेरिकन कॉंग्रेस आता ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवण्याची शक्यता आहे. अमेरिकन भावी राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाब वाढवला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय की अमेरिकन कायदा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तिच्या बचावासाठी नाही.
जो बायडेन म्हणाले की, "अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही."
Our president is not above the law.
Justice serves the people — it doesn’t protect the powerful. — Joe Biden (@JoeBiden) January 9, 2021
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन कॅपिटलमध्ये प्रवेश करुन अभूतपूर्व गोंधळ घातला होता. त्यानंतर झालेल्या हिंसेत आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. या माध्यमातून ट्रम्प अमेरिकन कॉंग्रेसवर दबाब निर्माण करत असल्याचं सांगण्यात येतंय.
युएस कॅपिटलमध्ये झालेल्या गोंधळानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतेय. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी केली असून त्या संबंधी न्याय विभागाकडे सल्ला मागितला असल्याचं सांगण्यात येतंय.
US Capitol Violence | अमेरिकेसाठी हा अतिशय लज्जास्पद क्षण; बराक ओबामांची तीव्र नाराजी
अमेरिकन संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसींनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "आपल्या समर्थकांना कॅपिटलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी जर राजीनामा दिला नाही तर सदन त्यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरु करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा अशी आशा सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास ट्रम्प यांच्यावर 25 वी घटनादुरुस्ती आणि महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे."
परराष्ट्र धोरणांशी संबंधित कमिटीचे अध्यक्ष ग्रेगरी मीक्स यांनीदेखील ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव सुरु करण्यात यावा अशी मागणी केली आहे. येत्या 20 जानेवारीला जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
धक्कादायक! US Capitol मधील अभुतपूर्व गोंधळावर जागतिक राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी