US Capitol Violence | अमेरिकेसाठी हा अतिशय लज्जास्पद क्षण; बराक ओबामांची तीव्र नाराजी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंदळावर आणि हिंसेवर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण राष्ट्रासाठीच हा अपमानास्पद क्षण असल्याचं ते म्हणाले.
US Capitol Violenceनं गुरुवारी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. राजकीय वर्तुळाला या घटनेनं खडबडून जाग आली आणि एक जबर हादराही बसला. विविध स्तरांतून आणि जागतिक पातळीवर नावाजलेल्या अनेक राजकीय नेतेमंडळींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली, तर कोणी डोनाल्ड ट्रम्प यांना आणि त्यांच्या धोरणांन धारेवर धरलं. त्यातच अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय आणि तितक्याच यशस्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रतिक्रियेनं सर्वाचं लक्ष वेधलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक निकालांबाबत तेथील संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती जिथ जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणाही केली जाणार होती. पण, त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, ज्यामुळं संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल इमारतीबाहेर एकच गोंधळ घातला. क्षणार्धातच या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं आणि लोकशाहीवरच हल्ला होत असल्याचं दृश्य इथं पाहायला मिळालं.
घडलेल्या या घटनेवर प्रतिक्रिया देत बराक ओबामा यांनी हा क्षण संपूर्ण देशासाठी अपमानास्पद आणि लज्जास्पद असल्याचं म्हणत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'इतिहास कॅपिटलमध्ये झालेल्या आजच्या या हिंसक घटनेला कायम लक्षात ठेवेल जिथं एका मावळत्या राष्ट्राध्यक्षानं निवडणुकांच्या निकालांबाबत तथ्यहीन प्रकारे फसवणुक करत अनेकांना भडकावलं. अमेरिकेसाठी हा एक अपमानास्पद आणि लज्जास्पद क्षण आहे', असं ते म्हणाले.
अमेरिकेच्या संसदेत घडलेली ही घटना अगदी अचानक घडली आहे, असं आपण म्हणालो तर ही स्वत:शीच केलेली थट्टा असेल असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर तोफ डागली. फक्त ओबामाच नव्हे, तर युके, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही या घटनेचा निषेध केला. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील या नेतेमंडीळींप्रमाणंच तीव्र नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायाला मिळालं.