Helicopter on Mars: नासाची अद्भुत कामगिरी, मंगळावर पाठवलेल्या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण
मंगळावर पाठवण्यात आलेलं नासाचं हेलिकॉप्टर Ingenuity ने आज पहिल्यांदा यशस्वी उड्डाण केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते.
वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आणखी एक नवा इतिहास रचला आहे. मंगळावर पाठवण्यात आलेलं नासाचं हेलिकॉप्टर Ingenuity ने आज पहिल्यांदा यशस्वी उड्डाण केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
नासानं सांगितलं की, रात्री जवळपास 3.30 वाजता इनजेनयुटी हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडाले असल्याने हे ऐतिहासिक मानले जात आहे. जवळपास 10 फुट उंच उडाल्यानंतर पुन्हा हे हेलिकॉप्टर लॅंड करण्यात आलं. हे जवळपास 30 सेकंदांपर्यंत सुरु होतं.
"Ingenuity has performed its first flight — the first flight of a powered aircraft on another planet!"
— NASA (@NASA) April 19, 2021
The data reveals: Our #MarsHelicopter has had a successful first flight: 🚁 pic.twitter.com/h5a6aGGgHG
नासाच्या Ingenuity या रोटरक्राफ्टने आपल्या चार कार्बन-फायबर पातींच्या आधारे उड्डाण घेतले. या पाती प्रति मिनिटाला 2500 वेळा फिरतात, अशी माहिती आहे. हा वेग पृथ्वीवर असलेल्या हेलिकॉप्टरच्या पातींच्या रोटेटिंग वेगापेक्षा जवळपास पाचपट अधिक आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत 100 पट अधिक हलकं असल्यामुळे पातींच्या क्षमता अधिक आहे.
इनजेनयुटी नावाचं हे अमेरिकी हेलिकॉप्टर मंगळावरील अशा स्थानांवर जाऊ शकणार आहे जिथं रोवर पोहोचू शकत नाहीत. हेलिकॉप्टर उड्डाण करण्यासाठी आधी 11 एप्रिल ही तारिख निश्चित केली होती, मात्र काही कारणास्तव ते उड्डाण होऊ शकलं नव्हतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
