(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Palestine War : इस्रायल-हमास युद्धात 5 तासांचा युद्धविराम, संघर्षात आतापर्यंत 4000 हून अधिक बळी
Israel Hamas War Ceasefire : इस्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas War) सुरु होऊन आज दहावा दिवस आहे. इस्रायल-हमास संघर्षात 5 तासांचा युद्धविराम सुरू झाला आहे.
Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात पाच तासांचा युद्धविराम (Israel Hamas War Ceasefire) लागू करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार 11.30 वाजता इस्रायल-हमास संघर्षात 5 तासांचा युद्धविराम सुरू झाला आहे. इस्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas War) सुरु होऊन आज दहावा दिवस आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील संघर्ष काही थांबवण्याचं नाव घेत नाही. हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला नेस्तनाभूत करण्याची शपथ घेतली आहे. इस्रायली सैन्याने गाझाला वेढा घातला आहे.
इस्रायल-हमास युद्धात 5 तासांचा युद्धविराम
पाच तासांचा युद्धविराम सुरू झाला असून यावेळी, अनेक देशांमधून पाठवण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत इस्रायल-गाझा सीमेवर असलेल्या रफाह क्रॉसिंगद्वारे दक्षिण गाझाला पाठवली जाणार आहे. यामध्ये सुमारे 1000 टन मदत सामग्री 100 ट्रकद्वारे दक्षिण गाझा येथे नेली जाईल. या जीवनावश्यक वस्तूंचं वितरण संयुक्त राष्ट्राद्वारे केलं जाईल. इस्रायलचं सैन्य मोठ्या संख्येने गाझाच्या सीमेवर तैनात असून हमास विरोधातील मोठं ग्राउंड ऑपरेशन कधीही सुरू होऊ शकतं.
इस्रायल सैन्य गाझावर हल्ल्याच्या तयारीत
गाझामध्ये घुसून हमासचं अस्तित्व मिटवण्याची इस्रायली सैन्याची योजना आहे. यासाठी गाझा सीमेवर लाखो इस्रायली सैनिक तैनात आहेत. इस्रायल लष्कर रणगाडे, चिलखती वाहने, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेसह सुमारे 3 लाख सैनिक गाझा सीमेवर उपस्थित आहेत. इस्रायली सैनिकांसमोर हमासचा खात्मा करण्याचं उद्दिष्ट आहे. इस्रायल सरकारचा आदेश मिळताच इस्रायल लष्कर गाझामध्ये शिरून हमासवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर इस्रायलचे नौदलही समुद्रात हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नेतन्याहू यांनी पीडितांची भेट घेतली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पीडितांची भेट घेतली. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या आणि दहशतवादी गटाने ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने नेतन्याहू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सवर इस्रायली ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ते त्यांचं सांत्वन करताना दिसत आहेत. इस्रायलच्या पीएमओने पोस्ट केले की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज मृत आणि बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
गाझामधील लोकांचं पलायन
हमासकडून दक्षिण इस्रायल आणि तेल अवीववर रात्रभर रॉकेट डागण्यात आले. त्याच वेळी, इस्रायली सुरक्षा दलांनी गाझाच्या उत्तर भागात आणि हल्ले केले. इस्रायली लष्कराच्या मते, सुमारे 600,000 हून अधिक लोकांनी गाझा शहरा आणि आसपासच्या परिसरातून पलायन केलं आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :