(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
लंडन : कोरोनाचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (12 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. "दोन आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर माझे प्राण वाचवल्याबद्दल मी आभार मानतो," असं बोरिस जॉन्सन म्हणाले.
ब्रिटीश पंतप्रधानाच्या अधिकृत निवासस्थान तसंच कार्यालय 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "पंतप्रधानांना रुग्णालयातू डिस्चार्ज देण्यात आला आहे. चांगली देखभाल केल्यामुळे पंतप्रधानांनी सेंट थॉमस रुग्णालयातील प्रत्येकाचे आभार मानले आहेत."
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 55 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन तातडीने कामावर रुजू होणार नाहीत. बोरिस जॉन्सन ठणठणीत बरे होईपर्यंत देशाचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक रॉब त्यांच्यावतीने संपूर्ण कामकाज पाहतील.
Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर
तसंच पंतप्रधानांच्या वतीने 10 डाऊनिंग स्ट्रीटच्य अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या इस्टर सण्डेच्या संदेशात लोकांना शुभेच्छा देताना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं. "जर तुम्ही या वीकेण्डला घर सोडलंत तर तुम्हाला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो किंवा कोरोना पसरु शकतो. त्यामुळे घरी राहा, एनएचएसला सुरक्षित ठेवा आणि जीव वाचवा."
If you leave the house this weekend, you could catch or spread #coronavirus.
Stay at home, protect the NHS and save lives. #StayHomeSaveLives pic.twitter.com/d9x9e98mEB — UK Prime Minister (@10DowningStreet) April 12, 2020
दरम्यान, बोरिस जॉन्सन यांना 27 मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी काही दिवसांसाठी स्वतःला आयसोलेट केलं होतं. परंतु, 6 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.
बोरिस जॉन्सन यांच्यावर आठवडाभर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना शनिवारी (11 एप्रिल) आयसीयूमधून बाहेर आणलं होतं. तर सात दिवसांनी म्हणजेच रविवारी (12 एप्रिल) त्यांना डिस्चार्ज मिळाला. बोरिस जॉन्सन यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही वेळ शतपावलीही केली.
कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास दहा हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 80 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित आहेत.